पहिला भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार प्रदान
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : भाऊसाहेब चांद्रायण हे भारतीय मजदूर संघाचा कणा होते. त्या काळी भारतीय मजदूर संघ किंवा संघ विचारांसाठी परिस्थिती अनुकूल नव्हती. तो परीक्षेचा काळ होता. परंतु अशा काळातही भाऊसाहेबांनी अत्यंत निष्ठा, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम केले, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्व. भाऊसाहेब चांद्रायण यांच्या कार्याचा गौरव केला.
सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च, नागपूर तर्फे आयोजित पहिला ‘स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार २०२६’ रविवारी चिटणवीस सेंटर येथे नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. याच प्रसंगी डॉ. कपिल चांद्रायण लिखित ‘सामान्यातील असामान्य भाऊसाहेब’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
विकास, संशोधन आणि सार्वजनिक जीवनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, डॉ. कपिल चांद्रायण आणि दिलीप चांद्रायण उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर गडकरी म्हणाले की, चांद्रायण कुटुंबाशी असलेल्या घनिष्ठ कौटुंबिक संबंधांमुळे सुरुवातीला हा पुरस्कार स्वीकारताना त्यांना संकोच वाटत होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असताना त्यांची भाऊसाहेब चांद्रायण यांच्याशी ओळख झाली होती, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
गडकरी म्हणाले, भाऊसाहेबांवर दत्तोपंत ठेंगडी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव होता. दत्तोपंत ठेंगडी हे एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व होते. भाऊसाहेबांनी आयुष्यभर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. कामगार संघटनांबद्दल भाऊसाहेबांचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक होता. कामगार चळवळही संघटित, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख असावी, असे त्यांचे मत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
कामगार चळवळीतील आपल्या अनुभवांचा उल्लेख करताना गडकरी म्हणाले, मी भाजपचा विधानपरिषद सदस्य असतानाही भारतीय मजदूर संघाचा अध्यक्ष होतो. दत्तोपंत ठेंगडी यांनी मला तशी परवानगी दिली होती. पुढे जाऊन मी आयएनटीयुसीचा प्रदेशाध्यक्षही झालो. बँका, सरकारी कार्यालये आणि संघटित क्षेत्रातील कामगार संघटनांना मिळालेले यश हे अशा समर्पित कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळेच शक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर होते. ते म्हणाले की, पहिल्या स्व. भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कारासाठी नितीन गडकरी यांची निवड सर्व दृष्टीने योग्य आहे. हा पुरस्कार नितीनजींना प्रदान करण्यात येत असल्याने, पहिल्याच वर्षी या पुरस्काराला मोठी प्रतिष्ठा मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
न्यायमूर्ती सिरपूरकर म्हणाले की, भाऊसाहेब चांद्रायण आणि नितीन गडकरी यांच्या कार्यात निस्वार्थ सेवेची समान भावना दिसून येते. भाऊसाहेबांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आयुष्यभर निस्वार्थ भावनेने काम केले. संघात वैयक्तिक लाभ नसतो; तिथे केवळ समर्पण आणि सेवाभाव असतो, असे त्यांनी सांगितले. गडकरींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि भविष्यातही मिळतील; पण भाऊसाहेबांच्या स्मृतीशी जोडलेला हा पुरस्कार त्यांच्यासाठी नेहमीच विशेष असेल, असेही ते पुढे म्हणाले.
तत्पूर्वी, डॉ. कपिल चांद्रायण यांनी प्रास्ताविक केले. स्व. भाऊसाहेब चांद्रायण यांच्या स्मृतीप्रत्यर्थ हा पुरस्कार सुरू करण्यामागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ‘सामान्यातील असामान्य भाऊसाहेब’ या पुस्तकाच्या उद्देशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, भाऊसाहेबांचे समाज आणि राष्ट्रासाठी असलेले निस्वार्थ कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे.
कार्यक्रमाचे संचालन नुपूर देशपांडे यांनी केले, तर अधिवक्ता शंतनू जोग यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला चांद्रायण परिवारातील सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक, सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







