लोकवाहिनी न्यूज:नागपूर : जिल्ह्यात सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक, कामगार व विद्यार्थी यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची नाकारता येत नाही. उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी, कामगार व नागरिक यांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहे.
या उपाययोजने अंतर्गत सर्व कोचिंग क्लासेसनी त्यांचे क्लासेस सकाळ व सायंकाळच्या सत्रात आयोजित करावे. दुपारी ११ ते ४.३० या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी राहील. विद्यार्थी करिता कोचिंग क्लास ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी व्यवस्था करावी व इतर अनुषंगिक उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
शक्यतोवर महाविद्यालयांनी दुपारच्या सत्रात परीक्षा व क्लासेस आयोजित करू नये, जर परीक्षा आधीच दुपारच्या सत्रात नियोजित असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकरीता मुबलक पिण्याचे पाणी, ओआरएस इत्यादी उपलब्ध करून द्यावे. परीक्षा हॉल थंड राहील याकरिता आवश्यक व्यवस्था करावी.
उद्योग, कारखाने, खाणी व बांधकाम ठिकाणी उष्णतेमुळे दुपारच्या वेळेस कामगार व मजूर यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याकारणाने त्यांना ११ ते ४ या दुपारच्या सत्रात विश्रांती द्यावी. या वेळेत कोणताही कामगार व मजूर मोकळ्या किंवा उघड्यावर जागेत काम करता कामा नये. दुपारच्या वेळी काम बंद ठेवणे शक्य नसल्यास आस्थापना, उद्योग प्रमुख यांनी कामगार व मजूर यांच्या सावलीकरिता शेडची व्यवस्था करावी व शेड थंड राहील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. कामाच्या ठिकाणी मुबलक थंड पिण्याचे पाणी व ओआरएस उपलब्ध करून द्यावे. कामगार व मजूर यांचेकरीता सुरक्षिततेच्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करावे.
विद्यार्थ्यांच्या वसतिगृह ठिकाणी मुबलक थंड पिण्याचे पाणी, आयव्ही, ओआरएस, कुलपॅक इत्यादी उपलब्ध करून द्यावे. वसतिगृह दुपारच्या वेळी थंड राहतील या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कराव्या.
सर्व शासकीय तसेच खाजगी रुग्णालय येथे उष्माघाताच्या अनुषंगाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या. कोल्ड वार्ड व रूम तयार करावे. मुबलक प्रमाणात अनुषंगिक औषधी, सलाईन, ओआरएस, कुलपॅक इत्यादी उपलब्ध ठेवावे. उष्माघाताकरिता उपचार होत असलेल्या रुग्णांची दैनंदिन माहितीचा तपशील ठेवावा. जिल्हा शल्य चिकित्सक हे नोडल अधिकारी असून यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, म.न.पा., नागपूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, अधिष्ठाता, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर तसेच खाजगी रुग्णालय यांच्याशी समन्वय साधून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करावी व आदेशात नमूद केल्याप्रमाणे शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील औषधी साठा व उष्माघात रुग्णाबाबतची माहिती प्रत्येक सोमवारी सादर करावी. आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक असून संबंधित सर्व विभाग, यंत्रणा, अधिकारी, आस्थापना यांनी आदेशात नमूद निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेशात नमूद आहे.









