आरंभी व पुसागोंदीत राकाँ (शप) विजयी
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नरखेड तालुक्यातील आरंभी येथे पक्षाच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय झाला. काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथे सरपंचपद बिनविरोध जिंकण्यात पक्षाला यश आले आहे.
नरखेड तालुक्यातील आरंभी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या उमेदवार रेखा नरेश गोरे यांनी विजय संपादन केला. त्यांनी भाजपच्या उमेदवार करिष्मा ढोबळे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. ही निवडणूक भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी प्रतिष्ठेची करण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, स्थानिक नेते नरेश गोरे आणि अनिल देशमुख यांच्या कामावर विश्वास दर्शवत गावकऱ्यांनी रेखा गोरे यांच्या बाजूने कौल दिला.
दरम्यान, काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथेही सरपंच पदासाठी पोटनिवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रोशनी श्याम जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. जाधव यांची उमेदवारी जाहीर होताच विरोधकांचे धाबे दणाणले, त्यांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात उतरू शकला नाही, परिणामी रोशनी जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या सत्कार समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मयूर उमरकर, दिपकजी चौधरी, नरेश गोरे, राजु चौधरी, अतुल पेठे, श्याम जाधव, काशीबाई राठोड, लताबाई पवार, भीमराव चव्हाण, तुकाराम राठोड, गेंदासिंग चव्हाण चंदन चव्हाण, उकंडराव राठोड, जगदीश चव्हाण, संदीप चव्हाण, राजेश राठोड, बादालसिंग राठोड, बालकिसन पवार, हरीश राठोड यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे तर आगामी निवडणुकीचे सुतोवाच : अनिल देशमुख
विजयी उमेदवारांचा सत्कार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, “ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जो विश्वास दाखवला आहे, तो अतिशय मोलाचा आहे. पुसागोंदीची बिनविरोध निवड आणि आरंभीमधील एकतर्फी विजय हे येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सुतोवाच आहेत.”









