छ. शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : कबड्डीचे स्वरूप आधुनिक होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
सेवानंद विद्यालय, कोराडी येथे ३० एप्रिल ते ४ मे २०२६ दरम्यान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नागपूर विभाग, ॲमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ आणि नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरचा राष्ट्रीय खेळाडू सुंशातू चौधरी यांनी आणलेल्या मशालीच्या मदतीने सुनेत्रा पवार यांनी स्पर्धेची मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना सुनेत्रा पवार यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत, “कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला मर्दानी खेळ असून त्यात शक्ती, युक्ती आणि चपळतेचा उत्कृष्ट संगम दिसतो. ही स्पर्धा केवळ खेळ नसून संस्कृती, शिस्त आणि संघभावनेचे प्रतीक आहे,” असे सांगितले. राज्यात क्रीडा सुविधा वाढविणे, खेळाडूंना नोकरी, विमा आणि प्रोत्साहन देण्यासाठी नवे क्रीडा धोरण आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. आशिष देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, टेकचंद सावरकर, उपमहापौर लीला हाथीबेड, अनिल निदान, प्रसन्न तिडके, डॉ. रानीष पोतदार, अशोक मानकर, हेमलता साखजी, अजय अग्रवाल, नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, पल्लवी धात्रक, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे, विदर्भ कबड्डी फेडरेशन चे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, क्रीडा अधिकारी पीयूष अंबुलकर, नरेंद्र बोरकर, आभा पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी : बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे यांनी या स्पर्धेच्या आयोजनामागील प्रयत्नांचा गौरव करत, “राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी, यासाठी अशा स्पर्धा प्रेरणादायी ठरतात,” असे सांगून खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन केले.
उद्घाटनानंतर चुरशीचे सामने
या स्पर्धेत राज्यभरातील ३२ संघांनी (१६ पुरुष व १६ महिला) सहभागी झाले आहेत. एकाचवेळी ४ मॅट कोर्टवर सामने खेळविले जात आहेत. उद्धाटनानंतर पुरुषांचे अमरावती जिल्हा विरुद्ध नांदेड जिल्हा व नागपूर जिल्हा विरुद्ध नाशिक जिल्हा असे सामने पार पडले तर महिलांचे नागपूर शहर विरुद्ध पालघर व नागपूर ग्रामीण विरुद्ध नांदेड असे चुरशीचे सामने झाले.









