जिल्हा प्रशासनाच्या बैठकीनंतर गॅस कंपन्यांचा निर्णय
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपूर शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गॅस कंपन्यांची संयुक्त बैठक घेऊन बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल कंपन्यांना दुपटीने सिलेंडर वाढवून देण्याचे निर्देश दिले. तसेच गॅस ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी व गॅस एजन्सी यांच्याकडे दररोज उपलब्ध होणारे गॅस सिलेंडर यांची गत महिनाभरातील आकडेवारी व रोजचा आढावा लक्षात घेऊन त्यांनी गॅस कंपन्यांना त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
जिल्ह्यातील वाढती मागणी आणि प्रलंबित बुकिंग लक्षात घेता एचपीसीएल, आयओसीएल आणि बीपीसीएल गॅस कंपन्यांनी नागपूरसाठीचा दररोजचा पुरवठा दुप्पट केला आहे. एचपीसीएल कंपनी कडून नागपूर शहरासाठी आधी जवळपास ८,४५० सिलेंडरचा पुरवठा केला जात होता. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूर शहर करिता आता जवळपास १९,७०० सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. बीपीसीएल कंपनीकडून ९९एमटी (जवळपास ६ हजार ९७२ सिलेंडर) चा दैनंदिन पुरवठा केला जात आहे. तसेच आयओसीएल कंपनीकडून ज्या गॅस एजन्सीमध्ये ग्राहकांची प्रतीक्षा यादी जास्त होती त्या एजन्सी करिता दुप्पट लोड (पुरवठा) पुरवठा केला जात आहे. यामुळे ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरसाठी यापुढे जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही.
प्रलंबित रिफिल बुकिंगचे वितरण ‘ज्यांनी आधी बुकिंग केले आहे त्यांना आधी सिलेंडर’ या क्रमाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या एजन्सीकडे तक्रारीचे प्रमाण जास्त आहे, तिथे अतिरिक्त वाहने आणि डिलिव्हरी बॉय तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून ग्राहकांना घरपोच सेवा जलद मिळेल. स्थलांतरित कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या ५ किलो एफटीएल गॅस सिलेंडरच्या वितरण प्रमाणातही दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
गॅस चोरी आणि बनावट डिलिव्हरी रोखण्यासाठी प्रत्येक सिलेंडरचे वितरण हे डॅक (ओटीपी) द्वारेच झाले पाहिजे तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीनी किमान ९० ते ९५ टक्के डिलिव्हरी डॅंकद्वारेच पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ज्या गॅस एजन्सीची डॅक ९० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त आहे अश्या गॅस एजन्सीजना गॅस कंपन्यांकडून सिलेंडरचा अतिरिक्त साठा कायम ठेवावा, असे निर्देशसुद्धा एलपीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
तांत्रिक अडचणींमुळे ज्या ग्राहकांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रांमध्ये ई-केवायसी मोफत करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून सर्व गॅस एजन्सींना खालील सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते, ज्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरु झालेली आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार वितरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी गॅस एजन्सीनी तातडीने शेडची व्यवस्था केली आहे. यामुळे भरउन्हात उभे राहणाऱ्या ग्राहकांचे उन्हाघातापासून संरक्षण होत आहे. प्रत्येक केंद्रावर ग्राहकांसाठी पुरेसे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार शहर आणि ग्रामीण भागातील केंद्रांवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
टंचाई लवकरच संपुष्टात
जागतिक परिस्थिती आणि तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेली ही टंचाई आता गॅस एजन्सीचा दैनंदिन पुरवठा वाढवल्यामुळे लवकरच संपुष्टात येईल, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.









