ममता बॅनर्जींनी धार्मिक अजेंडा राबविल्याचाही आरोप
लोकवाहिनी न्यूज
कोलकाता : जेव्हा बंगालाला पाकिस्तानचा भाग बनवण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा काँग्रेसने त्या कटवाल्यांपुढे शरणागती पत्करली. जेव्हा धार्मिक अजेंड्यामुळे बंगालचा आवाज दाबता जात होता, तेव्हा डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी एक ठराव मंजूर करून घोषित केले की बंगाल पाकिस्तानचा भाग बनणार नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे जाहीर सभेतून केला.
पश्चिम बंगालमधील हुगळी येथे ४७,६०० कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताच्या विकासाचे नेतृत्व करू शकणारा बंगाल मागे पडला आहे. बंगालवर परकीय विचारसरणी लादण्यात आली आहे. आधी काँग्रेस, डावे आणि नंतर टीएमसीने बंगाला अवैध स्थलांतरितांचे केंद्र बनू दिले. आता केंद्र सरकार राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी सातत्याने काम करत आहे.
निवडणुकांनंतर पश्चिम बंगालमध्ये एक नवीन वातावरण निर्माण झाले असून, राज्य विकासाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. बंगालच्या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास हे लोकशाही आणि मताच्या शक्तीचे प्रतीक आहे. निवडणुकीदरम्यान त्यांनी आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. आता पश्चिम बंगालमधील प्रत्येक गरीब व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल, हे सुनिश्चित करण्यात आले आहे. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांनाही थेट लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाने काम करत आहे. या ध्येयासाठी पूर्व भारताचा विकास सर्वोच मानून, केंद्र सरकार ‘मिशन पूर्वोदय’ अंतर्गत या प्रदेशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती देत आहे, असेही मोदी म्हणाले.
एकेकाळी खराब रस्ते आणि मोडकळीस आलेल्या पायाभूत सुविधांमुळे त्रस्त असलेला बंगाल आता वेगाने विकास अनुभवत आहे. कोलकाता मेट्रोच्या ऑरेंज लाईनवरील चिंगरीघाटा क्रॉसिंगचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आता पूर्ण झाले असून प्रलंबित प्रकल्प वेगाने पुढे जात आहेत. मागील सरकारांनी भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन हस्तांतरण अनेक दशकांपासून थांबून ठेवले होते. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रक्रियेला गती देण्यात आली आणि प्रलंबित सीमा सुरक्षा कामे पूर्ण होऊ लागली.
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता वितरित
पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरित केला. यांतर्गत देशभरातील ९.४४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १८,८८० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. एकट्या बंगालमध्ये ४५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात ९०० कोटी रुपये जमा करण्यात आले. याव्यतिरिक्त, पंतप्रधानांनी हावडा येथे संक्रेल-संत्रागाछी लिंक लाईन प्रकल्पाचे उद्घाटन केले, ३०० खाटांच्या नवीन रेल्वे रुग्णालयाची पायाभरणी केली आणि पूर्व मेदिनीपूरमधील हाओर-राधामोहनपूर रोड ओव्हरब्रिज प्रकल्पाची पायाभरणी केली.
ओडिशामध्ये ४७,६०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
ओडिशामध्ये भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘विकास रा धारा, ओडिशा सारा’ या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर येथे त्यांनी अंदाजे ४७,६०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री मोहन चरण माझी हेही उपस्थित होते. आज राष्ट्रपती मुर्मू यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी केवळ मयूरभंजचीच नव्हे, तर संपूर्ण ओडिशा राज्याची ओळख अधिक मजबूत केली आहे.










