कोल्हापूरच्या कृतज्ञता सोहळ्यात मोठे विधान
लोकवाहिनी न्यूज
कोल्हापूर : वर्ष २०१४ च्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी घुसखोरांचीच मतपेढी बनवली होती; मात्र प. बंगालच्या विजयाच्या निमित्ताने मी सगळ्या देशाला सांगू इच्छितो की हा देश धर्मशाळा नाही. या देशातील एक अन एक घुसखोराला शोधून काढू आणि या देशात एकाही घुसखोराला राहू देणार नाही. भारताची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची असून या देशात ज्यांना जन्म झाला आहे त्यांनाच या देशात राहण्याचा अधिकार आहे, असे ठाम प्रतिपादन देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. याआधी आम्ही ‘शिंदे गट’ असे म्हणत होतो. आता शिंदे गट वगैरे काही राहिले नाही. आता शिंदे यांच्याकडे आहे तीच शिवसेना झाली असल्याचेही ते म्हणाले.
ते पोलिस परेड मैदानावर ‘भव्य कृतज्ञता सोहळ्या’च्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत बोलत होते. या प्रसंगी विविध मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, तसेच कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील जोतिबाचा विकासही सुरू : मुख्यमंत्री
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. राज्यातील ५ जोतिर्लिंगासह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाचाही विकास चालू आहे. भाविकांसाठी या आराखड्यातून पुढील १०० वर्षात सेवा करता येईल असे व्यापक काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. पंढरपूर ‘कॉरिडोर’चे काम याच वर्षी आम्ही चालू करत आहोत. श्री क्षेत्र भीमाशंकर येथील विकासकामांना गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून गावकऱ्यांनी अख्खे गाव दीड किलोमीटर स्थलांतर करण्यास अनुमती दर्शवली आहे.”
शहांनी सहकार क्षेत्रात लोकाभिमुख बदल घडविले : उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राने संपूर्ण देशाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख दिली आहे. अमित शाह हे अतिशय कणखर गृहमंत्री असून देशातील नक्षलवाद संपवण्याचे काम केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे पूर्ण झाले. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात अनेक लोकाभिमुख बदल अमित शाह यांनी घडवले आहेत.










