‘वनवा बंदी कायदा’ आणण्याचा राज्य सरकारचा विचार
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काल लागलेल्या भीषण आगीत सुमारे ३० घरे जळून खाक झाली. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
बावनकुळे यांनी सांगितले की, नुकसानीच्या प्रमाणानुसार बाधितांना आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे त्यांना १ लाख रुपये, ७५ टक्के नुकसान झालेल्यांना ७५ हजार रुपये, तर ५० टक्के नुकसान झालेल्यांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. याशिवाय शासनाकडून तातडीने २३ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून घरबांधणीसाठी मोफत रेतीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आगीत कागदपत्रे जळालेल्या नागरिकांसाठी विशेष शिबिर आयोजित करून आवश्यक कागदपत्रे पुन्हा तयार करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना सायकली व शैक्षणिक साहित्य, तसेच जळालेले वीज मोटर आणि गॅस सिलिंडर पुनर्प्रदान करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून स्वयंपाकघरातील भांड्यांचे संच देण्यात आले असून महिनाभराचे अन्नधान्यही पुरवण्यात आले आहे. घरांचे पुनर्बांधकाम पूर्ण होईपर्यंत बाधित कुटुंबांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था शासनाकडून केली जाणार आहे.
काही नागरिकांचे गोठेही जळाले असून त्यासाठीही अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या जनावरांचा मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबांना पर्यायी जनावरे देण्याची योजना राबवण्यात येणार आहे. उमरेड एमआयडीसी परिसरातील ४० ते ५० कंपन्यांनी एकत्र येऊन सीएसआर निधीतून मदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
या आगीचे कारण एका शेतकऱ्याने शेतात लावलेल्या वणव्यामुळे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यात ‘वनवा बंदी कायदा’ आणण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्यामुळे मोठे नुकसान टळल्याचे त्यांनी नमूद केले. “फक्त यंत्रणा उपलब्ध करून देऊन उपयोग नाही, तर त्यांचे प्रभावी व्यवस्थापनही गरजेचे आहे,” असेही त्यांनी सांगितले. पंधरा दिवसांनंतर पुन्हा धामणगावला भेट देऊन कामांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांसमोर संसार उभा करण्याचे आव्हान
धामणगाव येथे शनिवारी लागलेली भीषण आग रात्री उशिरा शांत झाली. गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. त्यानंतर रविवारी सकाळपासून राखेच्या ढिगाऱ्यात गमावलेले साहित्य शोधताना गावकरी, जीव वाचला, आता संसार उभा करण्याचे आव्हान असल्याच्या चिंतेत दिसून आले. सुदैवाने वेळीच घराबाहेर पडल्याने धामणगाव येथील आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ५-६ गुरे आणि शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. सुमारे २५ घरे भस्मसात झाली आहेत. ही आग लगतच्या शेतांतून कचरा पेटविल्यानंतर पसरल्याचे सांगण्यात येते.
पुण्यातील प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात होईल. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी भक्कम पुरावे सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘शक्ती कायदा’ संदर्भात, त्यातील सर्व तरतुदी भारतीय न्याय संहितेत समाविष्ट करण्यात आल्याने स्वतंत्र कायद्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ येथील पाणीटंचाईच्या घटनेबाबत त्यांनी ती दुर्दैवी असल्याचे नमूद करत प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यााचे सांगितले.









