लोकवाहिनी न्यूज,नागपूर : सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई अंतर्गत संचालित नागपूर विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३५ व्या जयंतीनिमित्त सोमवारी साई सभागृहात ‘भीमगर्जने’ या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक अविनाश भगत, सहायक लेखाधिकारी रूपेश गायधने, अधीक्षक सीता खडसे, कुलदीप कावळे तसेच ज्येष्ठ कलाकार व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. आंबेडकरांच्या या महान विचारांचा प्रसार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत व्हावा व तरुण पिढीला त्याची जाणीव व्हावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून राज्यातील सहा महसुली विभागात ‘भीमगर्जने’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक बिभीषण चवरे यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम साकारला गेला.
या कार्यक्रमाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांमुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका रक्षंदा बोंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या सुरेल आवाजातून बाबासाहेबांना संगीतमय अभिवादन केले. बिभीषण चवरे यांनी लिहिलेल्या गीतांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. सर्व गीतांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. सांस्कृतिक कार्य विभाग, नागपूर विभागाच्या सहाय्यक संचालकांच्या वतीने सर्व कलाकार व उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.








