‘प्रहार’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून, तो प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट २००८ साली झालेल्या मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांची भूमिका साकारताना दिसत आहे. उज्वल निकम यांनी २६/११ हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला शिक्षा मिळवून देण्यासाठी न्यायालयात महत्त्वाची आणि कठोर कायदेशीर लढाई लढली होती. टीझरमध्ये या लढ्याची झलक दाखवण्यात आली आहे. १ मिनिट ५३ सेकंदाच्या या टीझरमध्ये राजकुमार राव कोर्टात जोरदार युक्तिवाद करताना दिसतो. तो विचारतो की, जेव्हा कसाब हल्ला करतानाचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून उपलब्ध आहेत, तरीही त्याला शिक्षा देण्यास उशीर का होत आहे? या दृश्यात तो मराठीतही एक लक्षवेधी संवाद म्हणतो, याला मारू नका हा एविडन्स आहे! हा संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
टीझरमध्ये कोर्टातील तणावपूर्ण वातावरण दाखवण्यात आले आहे. राजकुमार रावचा वकील म्हणून दमदार अभिनय पाहायला मिळतो. त्याचबरोबर अभिनेत्री वामिका गब्बी आणि अभिनेता जयदीप अहलावत यांचीही झलक टीझरमध्ये दिसते, ज्यामुळे कथेत अधिक खोली असल्याचे जाणवते. या चित्रपटातील आणखी एक खास आकर्षण म्हणजे मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर. तो या चित्रपटात अजमल कसाबची भूमिका साकारत आहे. त्याचे लूक आणि ट्रान्सफॉर्मेशन पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. त्याने या भूमिकेसाठी मोठे बदल केले असून त्याचा अभिनय खूपच वास्तववादी वाटतो, असे टीझर पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘प्रहार’ हा चित्रपट ७ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल सध्या प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. याआधीही राजकुमार रावने खऱ्या घटनांवर आधारित चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने ‘शाहिद’ या चित्रपटात वकील शाहिद आझमी यांची भूमिका साकारली होती. शाहिद आझमी हे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी लढणारे वकील होते. त्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय, राजकुमार राव लवकरच भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो सध्या क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. एकूच, ‘प्रहार’ चित्रपटाचा टीझर दमदार संवाद, वास्तववादी अभिनय आणि गंभीर विषयामुळे चर्चेत आला आहे.










