लोकवाहिनी न्यूज:नागपूर : भविष्यात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार नाही, अशी ग्वाही राजकारणात सक्रिय प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांच्या या विधानामुळे फुटलेले पवार कुटुंब आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
राजकारणात सक्रिय प्रवेश केल्यानंतर सुनेत्रा पवार आज प्रथमच नागपूरमध्ये आल्या होत्या. निमित्त होते, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाचे. या स्पर्धेला त्यांनी राज्याच्या क्रीडामंत्री म्हणून हजेरी लावली. तत्पूर्वी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कौटुंबिक एकोप्यावर भाष्य केले. विशेष म्हणजे, आजच खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील पुण्यात बोलताना यापुढे पवार कुटुंबाच्या कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात मी लढणार नाही, असे जाहीर केले. या भूमिकेबद्दल विचारले असता सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे मनापासून स्वागत केले.
मी राजकारणात आल्यापासून हीच भूमिका मांडत आहे की, कुटुंब आणि राजकारण नेहमी वेगळे ठेवले पाहिजे. आम्हा सर्व कुटुंबियांची सुद्धा हीच इच्छा आहे की भविष्यात आपसात असा सामना होऊ नये, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘विजयगड’ येथे कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद
विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर आगमन होताच शहराध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी सुनेत्रा पवारांचे प्रथम पुष्पगुच्छ देऊन उत्साही स्वागत केले. विमानतळावरील स्वागतानंतर सुनेत्रा पवार यांनी शासकीय निवासस्थान ‘विजयगड’ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि कार्यकर्त्यांच्या सूचना व समस्यांची निवेदने व्यक्तिगत स्वीकारली. सामान्यांचे प्रश्न सोडवणे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आमची प्राथमिकता आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. त्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
नगरसेविका आभा पांडे, बजरंगसिंग परिहार, तानाजी वनवे, जानबा मस्के, सुनीता येरणे, विशाल खांडेकर, दिलीप पनकुले आदी पक्षाचे विविध सेलचे अध्यक्ष, महिला आघाडी, युवक आघाडीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येण्याचे संकेत
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात नणंद-भावजय आणि काका-पुतण्या असा थेट संघर्ष पाहायला मिळाला होता. मात्र, बदललेल्या परिस्थितीत आता दोन्ही बाजूंनी मवाळ भूमिका घेतली जात आहे. कौटुंबिक कटुता बाजूला सारून पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येण्याचे संकेत या निमित्ताने मिळत असून, या नव्या राजकीय वळणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.









