महिला व पुरुष विभागात ठरले अजिंक्य
लोकवाहिनी न्यूज नागपूर : राज्य शासनाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नागपूर विभाग, ॲमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ आणि नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोराडी येथील सेवानंद विद्यालयाच्या प्रांगणात रात्री उशिरा पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर मुंबई शहर संघाने महिला व पुरुष विभागात अजिंक्यपद मिळविले.
महिला गटातील अंतिम सामना मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्यात रंगला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात मुंबई शहर संघाने ३२-२९ अशा फरकाने विजय मिळवला. मुंबई शहर संघाच्या स्वीटी सारण, तन्नू आणि हरमित संधू यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. मुंबई उपनगर संघाकडून याशिका पुजारी आणि प्रतीक्षा तांडेल यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरने पुणे जिल्ह्याला २४-२२ तर मुंबई शहर संघाने रत्नागिरीचा २६-२१ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.
पुरुष गटातील अंतिम सामना मुंबई शहर आणि पुणे जिल्हा यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई शहर संघाने ३३-१७ अशा एकतर्फी फरकाने पुणे संघावर मात करीत जेतेपद मिळविले. मुंबई शहर संघाच्या विजयात पंकज मोहिते, सुशांत आणि साहिल राणे यांनी दमदार खेळ केला. तर पुणे संघाकडून बालाजी जाधवने चांगला खेळ केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य लढतीत मुंबई शहराने अहिल्यानगरला ३०-२६ ने तर पुण्याच्या संघाने मुंबई उपनगरला ४२-२२ अशा गुणांनी मात देत अंतिम फेरी गाठली होती.
विजेत्यांना भरघोस बक्षीसे
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना तसेच, खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली. या प्रसंगी विविध मान्यवरांचा आणि स्पर्धेत सहकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात सतीश डफळे, नागपूर ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक, मनपा क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच प्रवीण किचलं, धनराज वानखेडे, नरेंद्र भड, दिलीप चव्हाण, रोशन पासवान, आकाश बुंदे, नरेश गाबधने, प्रणय भोंगाळे आणि राजेश रेवतकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चंद्रपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आणि वर्ध्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सौरभ फुकाली यांच्याकडून खेळाडूंना पेट्रोलसाठी ५००० ची मदत देण्यात आली.








