विरोधक २०४७ पर्यंत घरी बसतील
लोकवाहिनी न्यूजनागपूर : बंगालमधील जनतेने विकासाला मतदान करून ममता बॅनर्जी यांच्या ‘थर्ड डिग्री’ राजकारणाला उद्धवस्त केले. देशातील जनता विकासाच्या बाजूने आहे. महाराष्ट्रातील विरोधकांनी यापासून धडा घेतला पाहिजे. विशेषतः काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या सेनेने आता स्वतःच्या पक्षात सुधारणा केली पाहिजे, अन्यथा हे पक्ष २०४७ पर्यंत घरी बसतील. महाराष्ट्रातील जनताही आता विकासाच्या बाजूने आहे, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सकाळी वर्तवले.
पश्चिम बंगालसह आसाम व पुदुचेरीमधील भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. एवढेच नव्हे विरोधकांना डिवचण्याची संधीही भाजप नेत्यांना मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुंबईला रवाना होण्यापूर्वी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बंगालमधील भाजपच्या अभूतपूर्व यशावर ते म्हणाले, यावेळी त्यांनी बंगालमधील विजयाचे गुपितही सांगितले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी अनेक भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली. त्यामुळे तेथील जनतेलाही सुशासन आले पाहिजे, असे वाटत होते. त्याचा परिणाम मतपेटीत दिसून आला, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशीसाठी सरकार प्रयत्न करणार असून कुटुंबाला न्याय दिला जाईल, असे सांगितले.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचे प्रत्यक्ष रूप पश्चिम बंगालमधील अभूतपूर्व विजयातून दिसून येत आहे. प्रखर राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीमुळे तेथे परिवर्तनाची नवी दिशा मिळाली आहे. ३७० कलम असो किंवा राष्ट्रवादाचा मुद्दा, डॉ. मुखर्जी यांच्या दूरदृष्टीने आज देशाला आणि पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ च्या विकसित भारताचे स्वप्न समोर ठेवत देशाला दिशा दिली असून, त्याच मार्गाला प. बंगालमधील जनतेने कौल दिला आहे. भयमुक्त आणि सुरक्षित प. बंगालचा नारा स्वीकारत जनतेने भाजपच्या बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांना साथ दिली. गृहमंत्री अमित शाह यांच्या कणखर राजकीय धोरणांचा हा विजय असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.
आसाममध्ये हेमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला, तर पुदुचेरीमध्येही एनडीएला निर्णायक बहुमत देत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, अमित शाह यांचे मार्गदर्शन आणि पक्ष संघटनेच्या एकजुटीमुळे कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून हा ऐतिहासिक विजय साध्य झाला असल्याचे सांगत बावनकुळे यांनी आता देशाच्या विकासाला आणखी गती येणार असल्याची पुष्टी जोडली.
नसरापूरच्या आरोपीला यमसदनी पाठवू
यावेळी त्यांनी नसरापूर येथील पीडित प्रकरणावरही भाष्य केले. संपूर्ण महाराष्ट्र पीडित कुटुंबाच्या बाजूने उभा असल्याचे सांगत त्यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे संकेत दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात पीडितांना शब्द दिला असून, दोषींना यमसदनी पाठवण्यासाठी पोलिस आणि सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, अशी ग्वाही देखील बावनकुळे यांनी दिली.








