विजू माने यांचा आगामी मराठी चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ प्रेक्षकांना मैत्री, धमाल आणि गोव्याच्या किनाऱ्यावरील हसवणाऱ्या क्षणांचा अनुभव देणार आहे. हा चित्रपट मित्रांच्या वेडेपणाने भरलेल्या ट्रिपची गंमतीशीर कहाणी मांडतो. हा चित्रपट फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात म्हणजेच ३१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या वेब सीरिजमधून ओळखले जाणारे कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर ही तिकडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. यामध्ये खास आकर्षण म्हणजे अंकुश चौधरीच्या धमाल एन्ट्रीने चित्रपटातील गँगमध्ये आणखी रंग भरला आहे. विजू माने यांच्या दिग्दर्शनाखाली ही गँग गोव्याच्या किनाऱ्यावर होणाऱ्या वेडेपणाचे, मस्तीचे आणि मित्रत्वाच्या मजेशीर क्षणांचे अप्रतिम मिश्रण प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
नुकातच या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. मराठीत अशा प्रकारचा भव्य प्रसंगी साजरा झालेला हा सोहळा पहिल्यांदा रंगला आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते, तसेच संपूर्ण कलाकार-निर्माता टीम उपस्थित होती. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. पोस्टरमध्ये बाईकवर धमाल करणारी गँग, हवेत उडणाऱ्या बाटल्या व कॅन्स, रंगीबेरंगी कॉन्फेटी, पार्श्वभूमीवरील बीचची मस्ती, हे सर्व दृश्य प्रेक्षकांना फक्त ट्रिपची फीलिंग देत नाहीत, तर मैत्री आणि बेधुंद मजा अनुभवायला लावतात. प्रत्येक कलाकाराचे एक्सप्रेशन, त्यांचा वेगळा अंदाज आणि पोस्टरमधील ऊर्जा, संपूर्ण चित्रपटाच्या टोनची झलक देतात.
सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी या चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या चित्रपटात प्रेक्षकांना दिलेले हास्य निकोप आणि मनमोकळे आहे. मैत्री ही कोणत्याही चौकटीत न बसणारी भावना आहे, तिची भाषा फक्त मैत्रीचीच असते. गेली दहा वर्षे या कलाकारांनी जपलेला मैत्रीचा धागा आता पुन्हा चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करतो; त्यामुळे या चित्रपटाबद्दल अपेक्षा खूप वाढल्या आहेत. संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा.
दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले की, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट फक्त गोव्याला जाण्याचा प्रवास नाही, तो मित्रांसोबत जगलेल्या क्षणांचा खजिना आहे. मैत्री, धमाल, गोव्याच्या किनाऱ्यावरील नॉस्टॅल्जिया आणि हसण्याचा फुल्ल डोस देणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट मित्रांसाठी एक परिपूर्ण सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. चित्रपटाची निर्मिती विजुमेनिया प्रा. लि. आणि लाईट अँड शेड प्रस्तुत यांच्या बॅनरखाली केली आहे. लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली असून, पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आपटे आणि कुशल बद्रिके यांनी साकारले आहेत. मैत्री आणि धमाल यांचे अप्रतिम मिश्रण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, ही अपेक्षा सर्वांना आहे. ■









