नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
लोकवाहिनी न्यूज:चंद्रपूर : महाराष्ट्रातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवा प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयाम यांचा नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस २०२६ निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देशभरातील उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या निवडक १५ नर्सिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या.
चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला सोयाम यांनी गेल्या २४ वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. विशेषतः नक्षल प्रभावित व आदिवासी भागात आरोग्य जनजागृती, मातृ-शिशु आरोग्य सेवा आणि कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे. कठीण भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्तीप्रवण क्षेत्रे आणि आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्येही त्यांनी उच्च जोखीम असलेल्या गर्भवती माता आणि बालकांची सेवा तत्परतेने केली. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत केंद्र शासनाने त्यांना राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या या पुरस्काराने गौरविले.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाची संकल्पना ‘आमच्या परिचारिका, आमचे भविष्य : सक्षम परिचारिका जीव वाचवतात’ अशी होती. पुरस्कारामध्ये पदक, प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र आणि १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. ■









