अंदमानच्या सेल्युलर जेलची प्रतिकृती साकारणार : ‘लाईट ॲंड साऊंड शो’ मुख्य आकर्षण
लोकवाहिनी न्यूज:नागपूर: श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त ‘अंदमान एक तीर्थक्षेत्र’ या त्रिदिवसीय महोत्सवाचे व्हॉलीबॉल मैदान, लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौक, नागपूर येथे २८ ते ३० मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून हा भव्य महोत्सव साकारला जातो आहे.
‘अंदमान एक तीर्थक्षेत्र’ या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी ६.३० वाजता व्हॉलीबॉल मैदानावर त्रिदिवसीय व्याख्यानमाला आयोजित आली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन गुरुवार, २८ मे रोजी सायंकाळी ६.३० होईल. उद्घाटन सत्रानंतर ‘स्वा. सावरकर जाणून घेताना’ या विषयावर अमृत वक्ते विवेक घळसासी वक्तव्य करणार आहेत. शुक्रवारी २९ मे रोजी ‘हिंदुत्व’ या विषयावर प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे तर शनिवार, ३० मे रोजी ‘समाज क्रांतिकारक सावरकर’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते आशुतोष अडोणी विचार मांडतील.
प्रथमच साकारणार अंदमानच्या सेल्युलर जेलची भव्य प्रतिकृती
स्वा. सावरकर जयंती निमित्ताने नागपुरातील रहिवासी कलाकार प्रफुल्ल माटेगावकर आणि त्यांचे सहकारी अंदमान येथील ऐतिहासिक सेल्युलर जेलची ७०x८० फूट आकाराची भव्य हुबेहूब प्रतिकृती व्हॉलीबॉल मैदानावर साकारत आहेत. ज्या ठिकाणी स्वा. सावरकर यांच्यासह अनेक स्वातंत्र्यवीरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्या ऐतिहासिक सेल्युलर जेलची अशा प्रकारची प्रतिकृती संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदाच नागपुरात उभी राहत आहे. प्रफुल्ल माटेगावकर यांनी अंदमान येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील जेलचे मोजमाप करत त्याचे ग्राफिकल ड्रॉईंग आणि बारकाईने अभ्यास केला. सेल्युलर जेलची हुबेहूब ७०x८० फूट आकाराची प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली. या कामात त्यांना आर्किटेक्ट लक्ष्मी पत्रकार, हर्षद भोसले, सुदामा इंगळे, महेश वानखेडे, मनमोहन सिंग, आदित्य राठोड हे कलाकार साथ देत आहेत.
‘लाईट ॲंड साऊंड शो’ मुख्य आकर्षण
या तीन दिवसीय सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे ‘लाईट ॲंड साऊंड शो’ होय. सेल्युलर जेलच्या प्रतिकृतीच्या आत विविधरंगी लाईट्स लावण्यात येणार असून त्याला निवेदन व संगीताची जोड देत अतिशय विलोभनीय सादरीकरण केले जाणार आहे. व्याख्यान संपल्यानंतर ‘सेल्युलर जेलची प्रतिकृती’ या विषयावर आधारित ‘लाईट ॲंड साऊंड शो’चा अद्वितीय अनुभव रसिकांना घेता येईल.
हा कार्यक्रम निःशुल्क असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रकार परिषदेत प्रफुल्ल माटेगावकर यांनी केले. यावेळी नीरज दोंतुलवार, मनोज देशपांडे, गजानन निशितकर, जयंत आदमाने यांची उपस्थिती होती.









