अधिक मासानिमित्त भरगच्च कार्यक्रम
लोकवाहिनी न्यूजनागपूर : अधिक मासानिमित्त नागपूर नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र साखरखेर्डा येथील परमपूजनीय सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या परम पवित्र पादुकांचे नागपुरात आगमन झाले आहे. सद्गुरूंच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असून, संपूर्ण उपासना मंडळ भक्तरसात न्हाऊन निघाले आहे.
२३ मे ते १० जून या कालावधीत महाराजांचा नागपुरात मुक्काम राहणार असून, या दरम्यान विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक भक्तांच्या घरी सद्गुरूंच्या पादुकांचे आगमन होणार असून, पाद्यपूजा, काकड आरती, नैवेद्य, सायंआरती तसेच शेजआरती यांसारखे कार्यक्रम पार पडणार आहेत. सद्गुरूंच्या पादुका आपल्या घरी येण्याची भक्त मंडळी वाट पाहत आहेत.
महाराजांच्या नागपूर मुक्कामात दररोज भजन, नामस्मरण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. अधिक मास हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जात असल्याने या काळात सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने भक्त परिवारात आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूरकर भक्तांना सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन व पूजन करण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध झाल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.









