शिवसैनिक-पोलिस आमनेसामने
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क आणि शिवसेना भवन परिसरात रविवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. काँग्रेस जनता पार्टीच्या (सीजीपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनासाठी शिवाजी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखत धडकड सुरू केली. या कारवाईनंतर शिवसेना भवन परिसर शिवसेना सैनिक आणि पोलिस आमनेसामने आले, दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी घटनास्थळी येत रस्त्यावर ठिय्या दिल्याने परिसरातील तणाव वाढला.
कॉँग्रेस जनता पार्टीकडून रविवारी सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क मैदानावर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मैदान परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला. शिवसेना भवनासमोरील रस्त्यासह शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या विविध मार्गावर बॅरिकेड लावून वाहतूक आणि आंदोलकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले. मात्र, आंदोलकांनी बॅरिकेड पार करून मैदानाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आंदोलनात तरुण आणि तरुणींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत कारवाईला विरोध केला.
पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान काही महिला आंदोलकांनी रस्त्यावर बसून ठिय्या दिला. त्यांना हटवण्यासाठी महिला पोलिसांनी प्रयत्न केले, मात्र, काही आंदोलकांनी प्रतिकार केल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेऊन पोलिस व्हॅनमध्ये बसवले.













