लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्राची मजबूत अर्थव्यवस्था, कुशल मनुष्यबळ आणि औद्योगिक क्षमता लक्षात घेता जर्मनीतील लोअर सॅक्सोनी राज्यातील उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्पांसह संशोधन व विकास केंद्रे उभारावीत आणि जागतिक बाजारपेठांना सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांत औद्योगिक आणि आर्थिक सहकार्याचा कृती आराखडा मांडण्यात आला. यासाठी वरिष्ठ अधिकारी, उद्योग प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेला संयुक्त कार्यगट स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी दिला. महाराष्ट्राचा देशाच्या जीडीपीमध्ये १५ टक्के वाटा असून, देशातील जवळपास एक तृतीयांश थेट विदेशी गुंतवणूक राज्यात येते. २०३० पर्यंत एक ट्रिलियन आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट राज्याने ठेवले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक क्षमता तसेच जेएनपीए आणि आगामी वाढवण बंदरामुळे गुंतवणूक व निर्यातीच्या संधी वाढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फोक्सवॅगनच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि लोअर सॅक्सोनीमध्ये औद्योगिक भागीदारी मजबूत झाली आहे. चाकण येथील उत्पादन सुविधांचे आधुनिकीकरण आणि इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनांसाठी नव्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. वाहन उद्योगासह रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, बॅटरी, एरोस्पेस, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत अभियांत्रिकी क्षेत्रांत सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हरित ऊर्जा क्षेत्रात पवनऊर्जा, हरित हायड्रोजन, बॅटरी तंत्रज्ञान, हरित पोलाद, हरित अमोनिया आणि ऊर्जा साठवणूक प्रकल्पांसाठी संयुक्त गुंतवणुकीची संधी आहे. २०३५ पर्यंत ऊर्जा मिश्रणात हरित ऊर्जेचा वाटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये लोअर सॅक्सोनीतील विद्यापीठे व संशोधन संस्थांनी सहभागी व्हावे. संयुक्त संशोधन, दुहेरी पदवी अभ्यासक्रम, विद्यार्थी देवाणघेवाण, व्यावसायिक शिक्षण, जर्मन भाषा प्रशिक्षण आणि कुशल मनुष्यबळ विकासासाठीही दोन्ही राज्यांनी एकत्रित कार्यक्रम राबवावेत, असे फडणवीस म्हणाले.
मुंबईतच मराठी माणसाला हक्काचे घर
दरम्यान मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतच हक्काचे घर मिळावे आणि त्याला शहर सोडून बाहेर जावे लागू नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. २७ नोव्हेंबर रोजी नागरी निवारा परिषद अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याच्या आदेशांचे वितरण करण्यात आले. नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना हक्काची घरे देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

















