आगामी २०५१ पर्यंत राज्यांचे प्रतिनिधित्व कायम राहणारमहिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा मार्ग मोकळा
लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : देशाच्या संसदीय राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभेच्या जागांमध्ये सर्व राज्यांसाठी ५० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वाढीव जागांची राज्यांमधील सापेक्ष हिस्सेदारी २०५१ पर्यंत कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आगामी मतदारसंघ पुनर्रचनेत दक्षिण भारतातील राज्यांचे संसदीय प्रतिनिधित्व कमी होण्याच्या चिंतेला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आगामी ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक नव्या स्वरूपात संसदेत मांडण्याची सरकारची तयारी आहे. सध्या लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ आहे. प्रस्तावित सूत्रानुसार प्रत्येक राज्याच्या विद्यमान जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा विचार आहे. यामुळे लोकसभेची एकूण सदस्यसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. यापूर्वीच्या घटनादुरुस्ती विधेयकात लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० पर्यंत नेण्याची तरतूद होती. नव्या प्रस्तावातील अंतिम संख्या आणि अंमलबजावणीची रूपरेषा संसदेतील विधेयकाच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.















