आरोग्य सेवा, नियंत्रण कक्ष आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था : सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांना दर्शनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. अनुयायांची वाढती गर्दी लक्षात घेता स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा, शुद्ध पाणी, निवास व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर विशेष भर देण्यात येत आहे. यंदा प्रथमच प्रशासनाच्या वतीने अनुयायांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली असून, परिसरात एकूण १ हजार १८९ स्वच्छतागृहे उभारण्यात येत आहेत. यामध्ये सुमारे निम्मे स्वच्छतागृहे महिलांसाठी स्वतंत्रपणे उपलब्ध असतील. सर्व सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
दीक्षाभूमी परिसरात अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने व्यवस्थापन आणि समन्वयसाठी दक्षिण प्रवेशद्वारजवळ केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. या कक्षातून निवास व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा, वैद्यकीय सेवा आणि वाहतूक व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन उभारून विविध घडामोडींचे थेट प्रक्षेपण, आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन अनुयायांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण परिसरावर नजर
दीक्षाभूमी परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, ते केंद्रीय नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे गर्दीवर लक्ष ठेवणे, संभाव्य अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे. सुरक्षेसाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त, महिला सुरक्षा पथक आणि अग्निशमन दलही सज्ज ठेवण्यात येणार आहे.
तीन ठिकाणी वैद्यकीय कक्ष
अनुयायांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी परिसरात तीन ठिकाणी वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार आहेत. दीक्षाभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारजवळ, परिसराच्या आतील भागात आणि अण्णाभाऊ साठे चौकाजवळ हे कक्ष कार्यरत राहतील. येथे पुरेसे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध राहणार असून, हृदयविकारासारख्या गंभीर प्रसंगी तातडीची सेवा देण्यासाठी कार्डियाक वॅनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. हे वैद्यकीय कक्ष केंद्रीय नियंत्रण कक्षाशी जोडले जात आहेत.
स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्याला प्राधान्य
दीक्षाभूमी परिसर स्वच्छ आणि नीटनेटका राहावा, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. पुरेशा संख्येने मोबाईल स्वच्छतागृहे, नियमित साफसफाई, कचराकुंवड्या, डासजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी फवारणी आणि जंतुनाशकांची फवारणी करण्यात येणार आहे. स्वच्छता व्यवस्थासाठी पुरेसे मनुष्यबळ पुरवण्यासोबतच स्वच्छतेबाबत जनजागृती आणि देखरेख करण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. अनुयायांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येत आहे.
हरविलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष
गर्दीच्या पार्श्वभूमीवर अनुयायांच्या सुरक्षेसाठी तक्रार निवारण कक्षासह हरविलेल्या व्यक्ती व बालकांचा शोध घेण्यासाठी आणि सापडलेल्या वस्तु जमा करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. आपत्कालीन प्रसंगी मदत मिळण्यासाठी १८००१२३००६१ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
दीक्षाभूमी येथे येणाऱ्या प्रत्येक अनुयायाला सुरक्षित वातावरणामध्ये दर्शन घेता यावे आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच नियोजन सर्व सुविधांची उभारणी तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.













