नाती, प्रेम, आपुलकी आणि विश्वास यासोबतच रहस्याची गुंफण असलेला ‘इरावती’ हा मराठी चित्रपट १२ फेब्रुवारी २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिनमय प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश देशपांडे यांनी केले असून, डॉ. दिनेश वैद्य यांनी निर्मिती केली आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाती असतात. काही नाती जन्मापासून जोडलेली असतात, तर काही नाती काळानुसार निर्माण होतात. रक्ताच्या नात्याप्रमाणे प्रेम, विश्वास आणि आपुलकीतून तयार झालेली नाती महत्त्वाची असतात. अशाच नात्यांमधील भावना, त्यांचे महत्त्व आणि त्यांच्याशी जोडलेली रहस्ये यांची गोष्ट ‘इरावती’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, अलका कुबल-आठल्ये, विजय गोखले, सुनील बर्वे, संतोष जुवेकर, जूई भागवत, स्वरदा करंदीकर, मृणालिनी जांभळे आणि अवंती सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवी कलाकारांचा सहभाग आणि नात्यांवर आधारित कथा यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
निर्माते डॉ. दिनेश वैद्य यांनी सांगितले की, ‘इरावती’ हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट नसून, माणसामांमधील नाती समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात नाती जपणे आणि त्यांचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे. प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा आणि चित्रपट पाहिल्यानंतरही विचार करायला लावणारा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दिग्दर्शक निलेश देशपांडे यांच्या मते, प्रत्येक नात्याची एक वेगळी कहाणी असते. नात्यांमधील भावना, एकमेकांविषयीची ओढ आणि माणसांना जोडणारे भावबंध यांचा वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. चित्रपटाची कथा डॉ. दिनेश वैद्य यांची असून, पटकथा आणि संवादलेखन नदू परदेशी यांनी केले आहे. संवादलेखनात डॉ. दिनेश वैद्य यांचाही सहभाग आहे. छायाचित्रण अनिकेत के., संकलन सुबोध नारकर आणि संगीतदिग्दर्शन कमलेश भडकमस्कार यांचे आहे. इतर तांत्रिक कामांसाठीही अनुभवी कलाकारांनी योगदान दिले आहे.














