कारंजातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा | दोघेही संचमान्यतेसाठी निघाले होते
लोकवाहिनी न्यूज
वाशीम : शहरातील प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात संचमान्यतेसाठी कारंजाहून निघालेल्या दोन मुख्याध्यापकांवर काळाने घाला घातला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू झाला. ही घटना शेलूबाजारजवळील तपोवन फाट्याजवळ बुधवारी दुपारीनंतर घडली. या धक्कादायक घटनेमुळे कारंजा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मृतांत कारंजा नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक सय्यद आबीद हुसैन सय्यद रऊफ (वय ५६) आणि उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक नाझीम मोहम्मद नूर मोहम्मद (वय ५७) यांचा मृत्यू झाला. दुसरी दुचाकी (क्रमांक एमएच ३० बीव्ही ६३३१ ) चालक विजय गोविंदा चव्हाण (रा. पिंपळगाव) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुख्याध्यापक शाळेच्या संचमान्यतेच्या कामानिमित्त कारंजा येथून वाशीम येथील प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडे दुचाकीने निघाले होते. दरम्यान, शेलूबाजारजवळील तपोवन फाट्यावर समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही मुख्याध्यापकांसह दुसऱ्या दुचाकी चालकाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच कारंजा नगर परिषदेचे गटनेते बिलाल पुंजानी, उपाध्यक्ष ॲड. फिरोज शेकुवाले, शिक्षण सभापती जाकीर शेख आणि नियोजन सभापती नदीम राज यांच्यासह मृतांच्या नातेवाईक व शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उत्तरतरीय तपासणीसाठी मृतदेह मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
दोन्ही मुख्याध्यापक हे कारंजा नगर परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असल्याने त्यांच्या निधनाने शिक्षक वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. शालेय कामानिमित्त प्रवास करत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कारंजा नगर परिषद आणि शैक्षणिक क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला.













