लोकवाहिनी न्यूज नागपूर : पुण्यातील बेकायदा होर्डिंग्जविरोधातील कारवाईचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नागपूर प्रशासनालाही स्पष्ट संदेश दिला आहे. नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याने शहरात नेते आणि कार्यकर्त्यांच्या स्वागताचे फलक, होर्डिंग्ज लावण्याची स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी बेकायदा होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली आहे. विशेष म्हणजे, स्वतःच्या नावाचेही बेकायदा होर्डिंग लागल्यास पुरस्कारांच्या यादीत आपले नाव जाहीर करण्याची सूचना त्यांनी पुणे प्रशासनाला केली. त्यामुळे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिका आणि प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमधून पुण्यातील अतिक्रमणविरोधी मोहिमेचे आणि विशेषतः अवैध होर्डिंग्जवरील कारवाईचे कौतुक केले. याचवेळी त्यांनी नागपूरसाठीही महत्त्वाचा संदेश दिला. पुणे महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण आणि अवैध होर्डिंग्जविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईचे कौतुक करताना फडणवीस यांनी पुणे प्रशासनाने स्वीकारलेल्या अभिनव आणि पुणेरी धाटणीतील संकल्पनेचा विशेष उल्लेख केला. बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱ्यांची नावे पुरस्कारांच्या यादीत जाहीर करण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. एवढेच नव्हे, तर उद्या आपल्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तरी पुरस्कारांच्या यादीत आपलेही नाव जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी दिले.
आता नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या काळात शहरात राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून स्वागताचे फलक आणि होर्डिंग्ज मोठ्या प्रमाणावर लावले जातात. या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी आणि शहराचे विद्रूपीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बेकायदा होर्डिंग्ज ही केवळ पुण्याची नव्हे, तर सर्वच शहरांची समस्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी तसेच पादचाऱ्यांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. नियम केवळ शासकीय दस्तावेज किंवा शासन निर्णयांपुरते मर्यादित नसून त्यांचे प्रत्यक्ष पालन होणे गरजेचे आहे. त्यामागील उद्देश सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करणे हाच असल्याचे त्यांनी म्हटले.
स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष नेते असोत किंवा कार्यकर्ते, त्यांनी कायम जनतेमध्ये दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नव्हे, अशा शब्दांत फडणवीस यांनी राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही अप्रत्यक्ष संदेश दिला. त्यामुळे अधिवेशनापूर्वी नागपुरातील प्रशासन होर्डिंग्जविरोधात पुण्याच्या धर्तीवर काही अभिनव मोहीम राबवणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
















