विद्यापीठात आलेल्या निनावी पत्राने खळबळ
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : शिक्षण क्षेत्रात एका गंभीर गैरप्रकाराची भर पडली असून, मौदा येथील एकाच आवारात चालणाऱ्या दोन महाविद्यालयांमध्ये एमबीए द्वितीय सत्राच्या परीक्षेत सर्रास सामूहिक कॉपी सुरू असल्याची खळबळजनक तक्रार समोर आली आहे. ‘राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय’ आणि ‘विलासराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी’ या संस्थांमधील काही त्रस्त विद्यार्थ्यांनी याप्रकरणी थेट नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिवांकडे पुराव्यासह निनावी तक्रारी केल्या आहेत. हे दोन्ही कॉलेजेस एकाच आवारात असल्याने, तिडके कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देशमुख आणि देशमुख कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तिडके असे आलटून-पालटून परीक्षा केंद्रे दिले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना अंतर्गत पातळीवर कॉपी करणे सोयीचे व्हावे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकारामागे मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परीक्षा केंद्रावर प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांकडून दीड हजार रुपये घेतले जातात आणि जे पैसे देतात, त्यांना वेगळ्या खोलीत बसवून दिलेल्या पेपरमध्ये दिसून आला असून, तब्बल ९५ टक्के विद्यार्थ्यांचे उत्तर एका विशिष्ट पब्लिकेशनच्या नोट्समधील मजकुरासारखी जशीच्या तशी एकसारखी आहेत. एवढेच नव्हे तर, विलासराव देशमुख कॉलेजमध्ये जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या प्रथम सत्राच्या एमबीएच्या परीक्षेत चक्क ‘चॅट जीपीटी’चा वापर करून पेपर सोडवण्यात आले होते, त्याची तपासणी केल्यास सर्व प्रकार उघड होईल, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
हा प्रकार इतका पद्धतशीर चालतो की, परीक्षा सुरू असताना विद्यापीठाचे एखादे पथक तपासणीसाठी आल्यास महाविद्यालयाच्या मुख्य गेटवरूनच परीक्षा कक्षात त्याची आगाऊ माहिती दिली जाते. जे गरीब विद्यार्थी पैसे देऊ शकत नाहीत आणि या अन्यायाविरोधात बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांना बाहेर कुणाला हा प्रकार सांगितला तर हातपाय तोडू, अशा धमक्या दिल्या जात असल्याने विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक भवितव्य खराब होऊ नये म्हणून राज्यपाल, कुलगुरू आणि अधिष्ठाता यांच्याकडे ‘निनावी’ तक्रारी पाठवल्या आहेत. या दोन्ही महाविद्यालयांमध्ये नियमित विद्यार्थी येत नाहीत, केवळ सामूहिक कॉपीद्वारे उत्तीर्ण होण्याची हमी मिळत असल्याने ९५ टक्के विद्यार्थी येथे प्रवेश घेतात, असा दावा या पत्रात आहे. आतापर्यंत एमबीएचे तीन पेपर संपले असूनही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव संस्थेला असल्याने राजकीय दबावापोटी विद्यापीठ प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही ठोस दखल घेतलेली नसल्याचे दिसत असून, यावर आता काय कारवाई होणार यावर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.










