सेल्फी ठरली अखेरची आठवण, पाचही युवकांचे मृतदेह सापडले
लोकवाहिनी न्यूज
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरालगतच्या माथारदेवी परिसरात वर्धा नदीत बुडून पाच मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांचे मृतदेह शोधमोहिमेदरम्यान नदीतून बाहेर काढण्यात आले. नदीत उतरण्यापूर्वी काढलेली त्यांची एकत्रित सेल्फी आता त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी अखेरची आठवण ठरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण घुग्घूस परिसर शोकमग्न झाला आहे.
घुग्घूस शहरातील इंदिरानगर परिसरात राहणारे सम्यक देवराव सोनटक्के (१८), सनी अशोक आस्मपल्ली (१९), रोहित बाबाराव बोबडे (१९), शिव भास्कर केलझरकर (१९) आणि तन्मय नवनाथ पथाडे (१८) हे पाच मित्र काल दुपारच्या सुमारास माथारदेवी परिसरातील वर्धा नदीकाठी पोहण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.
शोधादरम्यान नदीकाठी युवकांचे कपडे, चप्पल आणि मोबाईल फोन आढळून आले. यामुळे ते नदीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथक, बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम राबविण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले.












