स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’, लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून, सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि कार्याचा प्रवास मालिकेत दाखवण्यात आला. मात्र, त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा सुरू होत असतानाच मालिका संपत असल्याचे सांगत, मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे आणि निर्माते असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खंत व्यक्त केली.
ही मालिका १४ जून रोजी तिचा शेवटचा भाग प्रसारित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या ५ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यामुळे मालिका बंद होणार असल्याची बातमी ऐकून अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ही मालिका होती. स्त्रीशिक्षण, समाजसुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि अंधश्रद्धेविरुद्धचा संघर्ष यांसारखे महत्त्वाचे विषय मालिकेत प्रभावीपणे दाखवण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम या मालिकेने केले. मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे आणि निर्माते असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिकेच्या समाप्तीबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात मोठे परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि कार्याचा प्रवास मालिकेत दाखवण्यात आला. ही मालिका केवळ १५२ भागांमध्ये संपत आहे, हे दुर्दैवी आहे. तरीही त्यांनी प्रेक्षकांना आश्वस्त केले आहे. फुले दाम्पत्याची कथा इथेच थांबणार नसून, ती भविष्यात एका नव्या माध्यमातून आणि नव्या स्वरूपात पुन्हा प्रेक्षकांसमोर आणली जाईल, असा संकेत त्यांनी दिला. त्यामुळे ही कथा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर किंवा वेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा पाहायला मिळू शकते.
दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ८ नव्या मालिकांची सुरुवात होणार आहे. नव्या कार्यक्रमांना वेळ देण्यासाठी काही जुन्या मालिकांना निरोप द्यावा लागत आहे. त्यामध्ये ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेचाही समावेश आहे. या मालिकेच्या जागी १५ जूनपासून दररोज सायंकाळी ७.३० वाजता ‘सुना येती घरा’, ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना एका नव्या कथानकाचा अनुभव घेता येणार असला, तरी ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेची उणीव अनेकांना नक्कीच जाणवणार आहे.









