स्थायी समिती सभापती यांची आयुक्तांसोबत बैठक
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर शहरातील ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक वारसा, प्राचीन मंदिरे यांची माहिती नागपुरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांना पुस्तिकेच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरला महत्त्वाचे पर्यटन हब तयार करण्यासाठी एक बैठक नागपूर महानगरपालिका येथे पार पडली. या बैठकीत स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे अध्यक्षस्थानी होत्या तसेच मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवानी दाणी-वखरे यांनी आपल्या अर्थसंकल्पात नागपूर पर्यटन विकास योजनाचे प्रस्ताव मांडले होते. या प्रस्तावावर चर्चा करताना शिवानी दाणी-वखरे यांनी बैठकीत सांगितले की, पंच परिवर्तन मधील स्व परिवर्तनाच्या दृष्टीने पर्यटन एक प्रभावी माध्यम आहे. आपले शहर आपली ओळख या भावनेतून जर आपण आपल्या शहराचा विकास करू तर स्थानिक पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल आणि शहराचा सुद्धा विकास अधोरेखित होईल. त्यांनी सांगितले की स्वतः पासून सुरू होणारे छोटे परिवर्तन पुढे जाऊन मोठ्या सामाजिक बदलाचे रूप धारण करू शकतात. तसेच त्यांनी १०० चौकात क्यू आर कोडच्या माध्यमातून शहरातील ऑडिओ व्हिज्युअल फिल्मच्या माध्यमातून त्या चौकातील माहिती पर्यटकांना मिळेल, माहिती पुस्तिका राज्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल तसेच विमानतळावर सुद्धा प्रवाशांसाठी माहिती पुस्तिका उपलब्ध राहील.
समिती सभापती यांनी नागपूर शहराचे आगळे वेगळे वैशिष्ट्ये असलेली मारबत महोत्सवाची माहिती सुद्धा जगभरातील पर्यटकांना देण्यासाठी आणि त्यांना नागपुरात येण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत सांगितले. पर्यटन वाढविण्याचे दृष्टीने एक अभिनव आयोजन केले जाईल. तसेच नागपुरात सावजी उत्सव, बुनकर उत्सव मोठ्या उत्साहाने आयोजित करण्याच्या प्रशासनाने योजना आखावी, असेही त्यांनी सांगितले.
या व्यतिरिक्त शताब्दी संग्रहालय तयार करण्यात येईल. या संग्रहालयात १०० वर्ष पेक्षा जुनी संस्था बद्दल माहिती प्रदर्शित करण्यात येईल. तसेच अत्रे ले-आऊट मध्ये डॉ हेडगेवार ई-वाचनालय मध्ये वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी महाराष्ट्र पर्यटन महामंडळ सह अन्य संस्थेकडून मदत घेऊन नागपूर शहराला पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचे नियोजन करण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकित, मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, मुख्य वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त निर्भय जैन, मंगेश खवले, गणेश राठोड, राजेश भगत, डॉ मेघना वासनकर, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, अश्विनी येलचटवार, मनोज सिंह, सुनील गजभिये, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वृक्ष संवर्धक अमोल चोरपगार आणि इतर उपस्थित होते. बैठकीत महापौर परिषद, स्थायी समिती सभापती परिषद, आंतरराष्ट्रीय भाषा शिकवणी केंद्र, सुषमा स्वराज स्पर्धात्मक परीक्षा प्रोत्साहन योजना, गणिती बगीचे निर्माण, दहन घाट, प्राथमिक शाळा निर्माण, दवाखाना निर्माण, आणि इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.













