लोकवाहिनी न्यूज
नवी मुंबई : झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आमचे आंदोलन आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे, कोणालाच व्यक्त होता येत नाही. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. अशी टीका नवी मुंबईत बुधवारी झालेल्या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनी केली. आंदोलनादरम्यान रोहित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहिणी खडसे यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक प्रश्नांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी मुंबईत बुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनात मोठा तणाव निर्माण झाला. काही वेळासाठी परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि पोलिस व आंदोलक आमनेसामने आले. या आंदोलनात पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलकांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. तसेच काही ठिकाणी प्रतीकात्मक निषेध म्हणून चूल मांडून भांडी वाजवत आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे महागाईविरोधातील असंतोष अधिक ठळकपणे व्यक्त झाला. सिडको एक्झिबिशन सेंटर परिसरात हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी जमावाला पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि पोलिस व आंदोलकांमध्ये बाचाबाची तसेच हलकासा धक्का-बुक्की झाल्याचे समजते. या दरम्यान पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले. रोहिणी खडसे यांना पोलिसांनी घटनास्थळावरून हटवताना हात धरून, उचलून बाजूला नेल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे कार्यकर्त्यांमध्ये काही काळ संतापाचे वातावरण निर्माण झाले.
आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनाबाबत म्हटले की, झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आमचे आंदोलन आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे, कोणालाच व्यक्त होता येत नाही. शेतकऱ्यांनी दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. कर्जमाफीत अनेक कठोर अटी आहेत. २०१८ च्या कर्जमाफीतही अनेक कठोर अटी होत्या. ३३ लाख शेतकऱ्यांनी २०१८ ला कर्जमाफीचा लाभ घेतला होता. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना फक्त ५० हजारांचा लाभ होणार आहे. ३ लाख कर्ज असेल, तर आधी १ लाख भरा मग २ लाख कर्जमाफी होणार आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. हे ते म्हणाले.
या आंदोलनानंतर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, महाराष्ट्रात आंदोलन करण्याची कुणाला परवानगी राहिलेली नाही. चालू नेत्यांना आंदोलनात पकडून घेऊन जाणे अतिशय चुकीचे आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. यामुळे सामान्य जनता प्रचंड अस्वस्थ झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाबाबत म्हटले की, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड होणारा भ्रष्टाचार यामुळे देशाची आर्थिक स्थिती अडचणीत आली आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील तीव्र झाल्या. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला असून, सरकारवर टीका केली आहे. आंदोलन करण्याचा लोकशाही हक्क हिरावला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरत असल्याची टीका देखील यावेळी करण्यात आली. दरम्यान, आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत आर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. कर्जमाफीच्या अटी कठोर असल्याने अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा दावा करण्यात आला. या संपूर्ण घटनेनंतर, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.













