राष्ट्रवादी वर्धापन दिनी सुनेत्रा पवारांचा संघटन मजबुतीकरणावर भर
लोकवाहिनी न्यूज
चिपळूण : संघटन मजबूत करण्यासाठी आजपासूनच कामाला लागा. गाव, वाडी, वस्ती आणि बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करा, आपण ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा यांचा समन्वय साधणार आहोत. महिलांचा आदर केला जाईल. मी पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देऊन, दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा मला माहित आहे.
योग्यवेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षातील पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार आणि शेकडो कार्यकर्त्यांना उद्देशून महत्त्वपूर्ण आणि तितकाच ठाम संदेश दिला.
या कार्यक्रमात त्यांनी पक्षाची आगामी दिशा, संघटनात्मक रचना आणि निर्णय प्रक्रियेतील शिस्त यांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. आपल्या भाषणात सुनेत्रा पवार यांनी संघटन मजबुतीसाठी तातडीने काम सुरू करण्याचे आवाहन केले. त्यांनी पक्ष विस्तारासाठी तळागाळात काम करण्यावर भर दिला. तसेच ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुण पिढीची ऊर्जा यांचा योग्य समतोल साधला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षात ज्येष्ठांचा सन्मान राखला जाईल आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी पक्षातील शिस्त आणि निष्ठा या मुद्द्यांवर विशेष भर दिला. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्या परिस्थितीत जबाबदारी पार पाडत असल्याचे सांगत त्यांनी या भूमिकेत येताना सर्व आव्हानांची जाणीव असल्याचे नमूद केले. मी पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे आणि अजित पवार यांच्या विचारधारेनुसार काम करत आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी पक्षात अनावश्यक हस्तक्षेप किंवा गैरशिस्त सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही दिला. कुणीही पक्षाच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप करत असेल, तर मला कठोर आणि कटू निर्णय घ्यावे लागतील, असे ठाम शब्दांत सांगताना त्यांनी पक्षहितासाठी आवश्यक असल्यास कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाची बदनामी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सुनेत्रा पवार यांनी पुढे सांगितले की, त्यांनी आतापर्यंत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच प्रत्येकाला सावरून घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत सांगितले की, दादांनी नेहमी सर्वांना सोबत घेतले, सन्मान दिला, संधी दिली आणि प्रत्येकाच्या भावना जपल्या. त्याच विचारांचा वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. त्या म्हणाल्या की, भविष्यात पक्षातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली जाईल आणि पात्रता, समर्पण तसेच पक्षनिष्ठा याच आधारावर संधी दिली जाईल. किती वर्षे काम केले यापेक्षा पक्षाला किती पुढे नेले याला अधिक महत्त्व दिले जाईल, असे त्या स्पष्टपणे म्हणाल्या.
महांडळे, पदे आणि विविध संघटनात्मक नियुक्त्यांबाबतही त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. अर्ज केलेल्या कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल, मात्र गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावरच निवड होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष विस्तारासाठी कधी कधी बाहेरून आलेल्या नेत्यांना सामावून घ्यावे लागते, मात्र अशा वेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान कमी होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.








