मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे चोख प्रत्युत्तर
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर आणि अमरावती या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप महायुतीचेच उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. आमच्याकडे ६०० हून अधिक मतांचे भक्कम संख्याबळ असल्याने आम्हाला कोणावरही दबाव टाकण्याची किंवा पैसे वाटण्याची अजिबात गरज नाही. उलट, समोर पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे काँग्रेस आता भाजपवर बिनबुडाचे आरोप करून स्वतःची लाज वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, अशा कडक शब्दांत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.
नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी विविध राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर भूमिका स्पष्ट केली.
भाजपने आपल्या नगरसेवकांना गोव्याला पाठवल्यावरून काँग्रेसने भाजप घाबरला अशी जी टीका केली होती, तिचा बावनकुळे यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘आम्ही आमचे नगरसेवक पर्यटनाला नेले म्हणजे आम्ही घाबरलो असा त्याचा अर्थ होत नाही. भाजप आपल्या लोकप्रतिनिधींची आणि कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. निवडणुकीच्या अशा पार्श्वभूमीवर पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्र आल्यामुळे संघटनात्मक समन्वय अधिक मजबूत होतो. आम्ही सर्वजण एकसंध आहोत, हाच संदेश यातून जातो. त्यामुळे आमच्या मतदारांची काळजी विरोधकांनी करण्याची मुळीच गरज नाही,’ असे स्पष्ट करत त्यांनी भाजप बॅकफूटवर नसल्याचा दावा केला.
काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार अतुल लोंढे यांनी घेतलेल्या बैठकांवर बोलताना बावनकुळे यांनी या बैठका केवळ फार्स असल्याचे म्हटले. नागपूर आणि अमरावतीतील निवडणुकीचा निकाल जवळपास आधीच स्पष्ट झाला आहे. भाजप महायुतीकडे तब्बल ६०० च्या आसपास मते आहेत, तर विरोधकांकडे जेमतेम २०० ते २२५ मतांचे संख्याबळ आहे. एवढा मोठा फरक असताना अशा बैठका घेऊन काहीही साध्य होणार नाही. मुळात विरोधी आघाडीत प्रचंड मतभेद आणि विस्कळीतपणा आहे, असा दावा करत बावनकुळे यांनी दोन्ही जागांवर महायुतीचा झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
अमरावती विधान परिषद निवडणुकीत दबाव टाकल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून कोणावर दबाव टाकण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांचा पराभव निश्चित असल्याने अशा प्रकारची विधाने केली जात असल्याचे त्यांनी केला. अमरावतीसह इतर भागांतील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत महायुतीच्या विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रेडी रेकनर दराबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, आतापर्यंत मोठ्या व्यावसायिक इमारती आणि छोट्या घरांना अनेक ठिकाणी समान दर लागू होत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत होता. आता राज्य शासनाने ‘मायक्रो झोन’ संकल्पना स्वीकारली असून परिसर, बांधकामाचा प्रकार आणि मालमत्तेच्या स्वरूपांनुसार स्वतंत्र रेडी रेकनर दर निश्चित केले जाणार आहेत. यामुळे मोठ्या इमारतींना वेगळा तर सर्वसामान्यांच्या घरांना स्वतंत्र दर लागू होईल आणि घर खरेदी-विक्रीवरील शुल्काचा भार कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
धान घोटाळ्याबाबत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, पटोले यांनी संबंधित कागदपत्रांची प्रत द्यावी. ती प्रत मुख्यमंत्र्यांना पाठवून विषय मंत्रिमंडळात मांडण्याची तयारी शासनाची असल्याचे त्यांनी सांगितले.
पीओपी मूर्तींबाबत पर्यावरणपूरक भूमिका
पीओपी मूर्तींबाबत विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे यांनी प्रदूषणमुक्त पर्यायांचा अवलंब करण्यावर शासन भर देणार असल्याचे सांगितले. पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीने मूर्ती निर्मिती व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोदींच्या नेतृत्वावर विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले की, विकसित भारताचा संकल्प देशाने स्वीकारला आहे. भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या दिशेने नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार असून भविष्यात त्यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







