लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नाग नदीमार्गे गोसीखुर्द धरणात पोहोचणाऱ्या सांडपाण्याच्या प्रश्नाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे नमूद करत न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा आधार घेत न्यायालयाने ही कार्यवाही सुरू केली. नागपूर शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होत असून त्यातील बहुतांश पाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याची माहिती न्यायालयासमोर आली. तथापि, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा एक भाग नाग नदीत सोडला जात असल्याने तो पुढे गोसीखुर्द धरणात मिसळत असल्याची बाब वृत्तातून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर धरणाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. या विषयाची सखोल तपासणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जून २०२६ रोजी होणार आहे. न्या. अनिल किलोर आणि न्या. राज बाकोडे यांच्यासमोर या खटल्यावर सुनावणी झाली.
नाग नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने सुमारे १,१२६.९९ कोटी रुपयांचा विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, विस्तृत मलनिस्सारण जाळे आणि पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, नदी प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असतानाच प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा नदीत सोडले जात असल्याने या प्रयत्नांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे प्रक्रिया न केलेले पाणी नदीपात्रात मिसळल्याचे निरीक्षण विविध अहवालांत नोंदविण्यात आले आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर याचा नेमका काय परिणाम होत आहे, याबाबत कोणतीही व्यापक सर्वेक्षण करण्यात आले नसल्याची बाबही पुढे आली आहे. यापूर्वी नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
दैनिक लोकवाहिनीची दखल!
दरम्यान, दैनिक लोकवाहिनीने २३ एप्रिल २०२६ च्या अंकात ‘गोसीखुर्द विषारी जलाशय होण्यापासून वाचवा : डॉ. प्रवीण महाजन’ या मथळ्याखाली एक वृत्त प्रकाशित केले होते. या बातमीतून नागपूर शहरातील सांड पाणी वाहून नेणाऱ्या नाग नदीचे पाणी गोसीखुर्द धरणात कशाप्रकारे जात आहे याचे वास्तव मांडले होते. बहुदा सर्वोच्च न्यायालयाने दैनिक लोकवाहिनीने प्रकाशित केलेल्या या वृत्ताची दखल घेत स्वतःहून याचिका दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला असावा, ही शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.












