नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमला संबोधित करताना सांगितले की, संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या बळकट होत असलेल्या आर्थिक विश्वासाकडे लागले आहे. जागतिक अर्थव्यवस्था, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा प्रतिष्ठित मंच पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत ही लोकशाहीची जननी आहे. भारतात १०० हून अधिक भाषा बोलल्या जातात. देशात सुमारे ८० हजार नोंदणीकृत वृत्तपत्रे आणि प्रकाशने आहेत, तसेच एक हजाराहून अधिक उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. एवढेच नव्हे, तर समाजमाध्यमांच्या युगात भारतात ५० कोटींहून अधिक यूट्यूब वापरकर्ते आहेत. भारतात विविध विषयांवर आणि विचारधारांवर सामूहिक चर्चा घडतात. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये परदेशी पाहुण्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्था अनुभव करून पहा. आपल्या देशात रस्त्यावरील विक्रेत्याचा व्यवसाय आणि मोटारींच्या दालनाचा व्यवसाय यांचा आकार व व्याप्ती वेगवेगळी आहे. मात्र, भारतात हे दोन्ही डिजिटल पेमेंटसाठी एकाच व्यासपीठाचा वापर करतात. हीच सर्वसमावेशक तंत्रज्ञानाची ताकत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम दरवर्षी जगातील सर्वोत्तम विचारवंतांना एकाच व्यासपीठावर आणतो. या कार्यक्रमाचे आयोजन पहिल्यांदाच भारतात झाल्याबद्दल त्यांनी ब्लूमबर्ग आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
ज्ञान, संपत्ती आणि सामर्थ्य असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांचा त्यांचा वापर कोणत्या उद्देशासाठी करतात, हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान यांनी सांगितले. सामर्थ्याचे खरे मूल्य त्याचा योग्य वापर करण्यात आहे. भारताची हजारो वर्षांची परंपराही हाच विचार शिकवते. देशाच्या प्रशासनात आणि कामकाजाच्या पद्धतीत हा विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान म्हणाले की, आज खरा प्रश्न सामर्थ्य कोणाकडे आहे, हा नसून त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो, हा आहे. तंत्रज्ञानाचा लाभ केवळ काही लोकांपुरता मर्यादित राहिला, तर त्याचा उद्देश अपूर्ण ठरतो. तंत्रज्ञानाचे खरे उद्दिष्ट लाखो लोकांसाठी नव्या संधी निर्माण करणे आणि त्यांची क्षमता वाढवणे हे असले पाहिजे.
तंत्रज्ञान, माहिती, ज्ञान आणि नवकल्पना ही आज मोठी सामर्थ्ये बनली आहेत. आता त्यांचा वापर सर्वसामान्यांच्या जीवन अधिक चांगले करण्यासाठी आणि प्रत्येकाची क्षमता वाढवण्यासाठी करणे आवश्यक आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. (पान ६ वर)











