नागपूर : देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. जंतर-मंतरवर तिरंगा फडकवण्यासाठीची परवानगी घ्यावी लागत आहे, असा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिनेता दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तिरंगा फडकवणे हा इतका मोठा गुन्हा झाला आहे का, की त्यासाठी पाच दिवस कोठडीत राहावे लागते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी हे आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना दीपके यांनी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवण्यात आल्याचा आरोप केला. आंदोलन करणाऱ्यांना ‘शहरी नक्षलवादी’ ठरवण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. आपल्याला सुरक्षेची गरज नसल्याचे सांगत, अटक करायची असल्यास सरकारने अटक करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
नावे वगळण्याचा मुद्दा महत्त्वाचा
मतदाराद्यादीतून नागरिकांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत दीपके म्हणाले की, मतदारयादीत नावच नसेल, तर संबंधित व्यक्ती मतदानासाठी मतपत्रिकेपर्यंत पोहोचणार कशी? त्यामुळे मतदारयादीतून नावे वगळण्याचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असली, तरी मतदारांची नावे वगळली जात असताना सर्वोच्च न्यायालय काय करत होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पश्चिम बंगालमधील मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारले.
इंडिया आघाडी and त्यांचे आंदोलन एकाच उद्देशासाठी सुरू आहे. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवणे, हा या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. मात्र, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हा स्वतंत्र दबावगट असून, तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी किंवा अन्य नेत्यांशी आंदोलनाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आंबेडकरांच्या विचारांवर देश चालेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत दीपके म्हणाले की, भारताचे संविधान आणि बाबासाहेबांचे विचार हेच देशाचा आधार आहेत. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारधारा देशावर लादण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी देश बाबासाहेबांच्या विचारांवरच चालेल. सामाजिक न्यायाच्या विचारारातून अन्यायग्रस्त व्यक्तींच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांच्या न्यायासाठी लढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.














