फ्रान्स आणि म्यानमारचे भिक्खू प्रमुख अतिथी
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आज सायंकाळी ५.३० वाजता ७०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या धम्मक्रांतीचा जागर या निमित्ताने होईल.
वंद्याच्या सोहळ्यात बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाची सद्यस्थिती अनुयायांना सांगितली जाईल. उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲड. शैलेश नारनवरे न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देतील. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. फ्रान्स आणि म्यानमारचे भिक्खू प्रमुख अतिथी असतील, या सोहळ्याला भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते धम्मविजय, भंते धम्मप्रकाश, भंते नागप्रकाश, भंते बुद्धदीप, भंते कुशीनागा, भंते महानागा, भंते कुमारकश्यप, भंते नागानंद, भंते धम्मपाल, भंते अनुत्तरबोधी, यांच्यासह भिक्खू संघातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दीक्षाभूमीच्या सुशोभीकरणकामांची माहितीही यावेळी दिली जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीची साक्षीडार असलेल्या दीक्षाभूमीला जगभरातील बौद्ध अनुयायांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागापासून देशातील विविध राज्यांतील हजारो अनुयायी दरवर्षी येथे येऊन धम्मदीक्षा ग्रहण करतात. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक स्थळ नसून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवमुक्तीच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे. येथून मिळणारी ऊर्जा अनुयायांच्या जीवनाला सकारात्मक दिशा देते, असे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी सांगितले.













