नागपूर पदवीधर निवडणूक लढण्यावर ठाम
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणारे आणि शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे सांगून मतदारांची दिशाभूल करणारे नितेश कराळे (कराळे गुरुजी) यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. अभिजीत वंजारी यांच्या विरोधात उमेदवारी कायम ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वर्ध्यातील नितेश कराळे यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन आणि महाविकास आघाडीच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे अॅड. अभिजीत वंजारी निवडणूक लढवत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नितेश कराळे यांनीही उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने आघाडीच्या अधिकृत उमेदवारासमोर आव्हान निर्माण झाले आहे. पक्षाच्या धोरणानुसार आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणे अपेक्षित असताना कराळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. कराळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पवार यांनी नागपूर विभागाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळाल्याचे स्पष्ट केले होते. तरीही कराळे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाण्याचा प्रकार घडल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले. तसेच, शरद पवार यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण केला जात असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.
महाविकास आघाडीच्या निर्णयाला विरोध करणे, पक्षाच्या धोरणाविरोधात निवडणूक लढविणे आणि पक्षनेतृत्वाच्या पाठिंब्याबाबत संभ्रम निर्माण करणे, या बाबी पक्षशिस्तीच्या विरोधात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराळे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी दिली. मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. यंदाही त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या मतविभाजनावर त्याचा कितीपत परिणाम होतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
मागच्यावेळी पाच हजारांपेक्षा जास्त मते
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे कराळे गुरुजी यांनी यापूर्वीच २०२० च्या निवडणुकीतसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघारसुद्धा घेतली नव्हती. त्या वेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्हते. त्यांना पाच हजारांहून अधिक मते मिळाली होती.













