एकाच मोबाईल नंबरने २२ हजार मतदारांची नोंदणी
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : एकाच मोबाईल नंबरचा वापर करून तब्बल २० ते २२ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. हा नंबर एआय जनरेटेड किंवा काल्पनिक असल्यासारखा असून या सीरीजचा कोणताही प्रत्यक्ष फोन नंबर अस्तित्वात नाही, त्यामुळे हा नंबर नेमका कुणाचा पत्ता लागत नाही. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकाच मोबाईल क्रमांकावरून तब्बल २२ हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्त अतुल लोंढे यांनी केला. या कथित प्रकाराची निवडणूक आयोगाला बारंबार माहिती देऊनही कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. या मुद्द्यावरून त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत या निवडणुकीत भाजपकडून ‘फिक्सिंग’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून २२ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदार नोंदणीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत अशा प्रकारची बाब समोर येत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची माहिती निवडणूक आयोगाला बारंबार देण्यात आली; तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आयोगाने तक्रारींची दखल घेऊन चौकशी करणे अपेक्षित असताना निष्क्रियता का दाखवली जात आहे. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तक्रारीची पारदर्शक चौकशी आणि त्यावरील कारवाईची माहिती सार्वजनिक करणे महत्त्वाचे ठरते, असेही लोंढे म्हणाले.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला होता. याआधी ८ हजार ७४४ मतदारांची नावे दुबार असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. निवडणूक आयोग पूर्णपणे जनसाठी काम करत आहे. आम्ही याबाबत पत्रव्यवहार करून माहिती मागितली होती, मात्र अद्याप आरटीआय किंवा इतर माध्यमातून याचे उत्तर देण्यात आले नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीच्यावतीने देशभर आंदोलन सुरू आहे. नागपूर शहरात पदवीधर मतदारसंघाचे एकूण १ लाख ४५ हजार मतदार असून, ४८ विविध संघटनांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजप पूर्णपणे घाबरली आहे; म्हणूनच मुख्यमंत्र्यांना येथे दोन दिवस मुक्काम करावा लागला, असा दावाही त्यांनी केला.
या वेळी लोंढे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही टीका केली. महागाई, बेरोजगारी आणि पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून गैरप्रकारांचा आधार घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, बोगस मतदान रोखण्यासाठी काँग्रेस पाषाने आपली चोख यंत्रणा सज्ज ठेवली असून, कोणी दुबार किंवा बोगस मतदान करताना आढळल्यास आमचे कार्यकर्ते कायदेशीर व कडक कारवाई करायला तयार आहेत. भाजपचे हे गैरप्रकार जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून निवडणुकीत त्यांना योग्य उत्तर देईल, असा इशारा अतुल लोंढे यांनी दिला.













