खासदार धानोरकरांच्या वक्तव्याने एकोप्याचे पितळ उघडे
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी दुसऱ्यांदा नशीब आजमावण्याच्या तयारीत असताना पक्षातील अंतर्गत मतभेद त्यांच्या अडचणी वाढवित आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वंजारी यांच्या निवडणूक तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे काम करत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
भाजपमध्ये सुरुवातीला प्रा. अनिल सोले यांच्या भूमिकेमुळे निर्माण झालेले राजकीय समीकरणे आता बदलताना दिसत आहेत. प्रा. सोले आता भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या पाठीशी उभे आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही विजयादशमीच्या दिवशी कोहळे यांना विजयाचा आशीर्वाद दिल्याने भाजपच्या गोतातील एकजुटीला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
निवडणुकीत उमेदवाराची वैयक्तिक प्रतिमा आणि जनसंपर्क जितका महत्त्वाचा असतो, तितकीच पक्षसंघटनेची ताकदही निर्णायक ठरते. पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात सक्रिय नसतील, तर त्याचा फटका उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे वंजारी यांना स्वतःच्या तयारीसोबतच पक्षातील विविध गटांना एकत्र आणण्याचे आव्हान पेलताना तारेवरची कसरत करावी लागली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यांनी खर्चाचा हातही आखडता घेतल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे.
महाविकास आघाडीसमोर मर्यादा
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्व विदर्भातील ताकदही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. अनिल देशमुख आणि सलील देशमुख यांच्यापलिकडे प्रभावी नेतृत्वाची उणीव जाणवत आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना मागील निवडणुकीत जलवा दाखवता आला नाही. त्यामुळे आघाडीसमोर विशेषतः वंजारींसमोर आव्हाने वाढली आहेत. शिवसेनेच्या मशालीची धaghi विझण्याच्या मार्गावर आहे.
कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रभावी समन्वय साधला गेला नाही, तर त्याचा फायदा भाजपला मिळणार आहे. पदवीधर मतदारसंघापर्यंत पोहोचण्यासाठी संघटित प्रचार, कार्यकर्त्यांची सक्रियता आणि मतदारांशी थेट संपर्क या बाबी निर्णायक ठरणार आहेत.
सत्तेचा फायदा कोहळेंना
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पक्षाच्या उमेदवाराला संघटनात्मक आणि राजकीय पातळीवर त्याचा फायदा मिळण्याची चिन्हे अधिक आहेत. भाजपमधील संभाव्य मतभेद दूर होऊन नेत्यांची एकजूट दिसू लागली आहे. कोहळे यांची ही बाजू अधिक भक्कम आहे. काँग्रेसमधील नाराजीचे रूपांतर प्रत्यक्ष मतांमध्ये किती होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नागपूर विभागात अभिजित वंजारी यांच्या भाग्याची चावी पदवीधर मतदारांच्या हातात, अन् पदवीधर सध्या भाजपच्या खिशात असे चित्र आहे.













