घोडेबाजाराच्या आरोपांवरून राजकारण तापले
लोकवाहिनी न्यूज:मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार होत असल्याचा आरोप उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी नाशिकमध्ये उमेदवार न देण्याच्या निर्णयावरून राऊतांना लक्ष्य करत, नाशिकमधून किती बॅगा भरून आणल्या? असा थेट सवाल केला. तसेच इतरांवर आरोप करण्यापूर्वी नाशिकमधील घडामोडींची खुलासा करावा, अशी मागणी करत भाजपने राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. बन यांनी म्हटले की, माणसे टिकवण्यासाठी पैशांची गरज नसते, तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीची आवश्यकता असते. मात्र संजय राऊत आणि त्यांच्या नेतृत्वाकडे माणुसकीच उरलेली नसल्यामुळे त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकले, ना नेते टिकले. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने नेहमीच प्रेमाने आणि विश्वासाने माणसे जोडण्याचे काम केले आहे, असे त्यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी घोडेबाजाराचे आरोप करण्यापूर्वी नाशिकमधील परिस्थितीबाबत उत्तर द्यावे, अशी मागणीही नवनाथ बन यांनी केली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी उमेदवार का दिला नाही? दोन उमेदवारी अर्ज दाखल करूनही अखेर उमेदवार रिंगणात उतरवला गेला नाही. याचे नेमके काय कारण होते, याचा खुलासा संजय राऊत यांनी करावा. तसेच नाशिक दौऱ्यातून त्यांनी किती बॅगा भरून आणल्या, याचे उत्तरही त्यांनी जनतेला द्यावे, असे बन यांनी म्हटले. यावेळी नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या हिंदुत्वावरील वक्तव्यांवरही निशाणा साधला. हिंदुत्वाला कोणीही संपवू शकत नाही किंवा त्याला अडथळा आणू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले हिंदुत्ववादी विचार आजही समाजात जिवंत आहेत. त्यामुळे हिंदुत्वाला बुच लागल्याचा दावा चुकीचा आहे. उलट विधानसभा निवडणुकीत जनतेने उद्धव ठाकरे गटाला नकार दिला, हे वास्तव स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीला संख्याबळाचा विश्वास
नवनाथ बन यांनी पुढे सांगितले की, महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यश मिळाले, तर काही ठिकाणी तसे शक्य झाले नाही. त्यामुळे केवळ नाशिकचा मुद्दा पुढे करून भाजपवर टीका करणाऱ्यांनी जळगावमधील परिस्थितीकडेही लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असून आगामी काळात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निष्ठा राऊतांना शोभत नाही
निष्ठेच्या मुद्द्यावरही नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. निष्ठा या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार राऊत यांना नाही, असे ते म्हणाले. भूतकाळात ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली, त्यांनी निष्ठेचे धडे देणे हास्यास्पद वाटते. शिवसैनिकांना निष्ठेचा अर्थ समजावून सांगण्याची गरज नाही, असेही त्यांनी केले. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना नवनाथ बन यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचे संख्याबळ महायुतीच्या बाजूने असल्यामुळे विजयासाठी कोणत्याही प्रकारच्या घोडेबाजाराची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील सर्व निर्णय महायुतीतील तिन्ही पक्षांच्या चर्चेनंतर घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.













