शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांतून मोहिमेला प्रारंभ
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरात सुरू केलेल्या वृक्षारोपणाच्या महामोहिमेची सुरुवात महापौर नीता ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्याचप्रमाणे नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार विकास ठाकरे, आमदार संजय भेंडे यांच्यासह उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार अनिल सोले व प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रफुल्ल हिंगे यांच्यासह झोन सभापती, प्रभागातील सर्वपक्षीय नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरातील विविध भागांमध्ये या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहराची स्वच्छता व संवर्धनासाठी तसेच शहराचे हिरवे आच्छादन वाढवण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनापासून (ता. ५ जून) ते जागतिक योग दिन (ता. २१ जून) पर्यंत मनपा तर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. मनपाच्या वृक्षारोपण महामोहिमेचा उपक्रम या साखळीतील एक भाग आहे. शहराचे हिरवे आच्छादन वाढवण्यासाठी झाडांची संख्या वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. वाढते तापमान व पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा सामना करण्यासाठी झाडांची संख्या वाढवण्यासाठी महापौर नीता ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे.
नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांतून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. धंतोली झोनमधील सुयोगनगर उद्यानात महापौर ठाकरे व आमदार संजय भेंडे यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शनी धवड, माजी उपमहापौर संदीप जाधव, नगरसेविका विशाखा मोहोड, नगरसेवक संदीप गवई, नगरसेविका पूजा भुगावकर, नगरसेवक रितेश गावंडे, नगरसेवक रमेश भंडारी, अंकित चौधरीसह इतर नगरसेवक सहाय्यक आयुक्त प्रमोद वानखेडे यांच्यासह परिसरातली मान्यवर नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार संजय भेंडे यांचा नरेंद्रनगर नागरिक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री भूषण केशरकर, सुरेश रेवतकर, संजय खोरगडे, संजय सिन्हा, स्वाती लांजेवार, रंजना धकाते, चैताली वानखेडे, छाया पराशर, अमित पुजारी, राजू पागोरे बिट्टू चव्हाण उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर ठाकरे यांनी केवळ दिवसासाठी नव्हे तर वर्षभर शहराच्या स्वच्छतेसाठी तसेच संवर्धनासाठी विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे रेन हार्वेस्टिंग व सोलरचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले.
मनपाची ही मोहीम स्तुत्य असून प्रत्येकाने एक झाड आपल्या घरासमोर लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आमदार संजय भेंडे यांनी केले. त्याचप्रमाणे प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी दयाशंकर तिवारी यांनी पाण्याचा वापर नियंत्रित करावे तसेच भूजल पातळी वाढवण्यासाठी पाणी जमिनीत मुरण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ स्वानंद सोनी यांनी पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा व विनाकारण पाण्याची नासाडी करू नये, असे आवाहन केले. आता आपण पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला नाही तर पुढील पिढीला त्याचा फटका सहन करावा, असे इशाराही त्यांनी दिला.
कापडी पिशव्यांचे वाटप
यावेळी वृक्षसंवर्धन व स्वच्छतेसाठी उपस्थितांनी शपथ घेतली. यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करावा, यासाठी यावेळी महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नरेंद्रनगर नागरिक मंडळाचे स्वयंसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












