महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : विदर्भातील निवडणुकांची जबाबदारी माझ्याकडे असून उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांनी योग्य भूमिका घेतली आहे. ज्या ठिकाणी एकतर्फी मतदानाची स्थिती आहे, तेथे पराभव निश्चित असल्याचे दिसत होते. उमेदवारी मागे घेणाऱ्यांनी स्वतःच्या राजकीय आकलनानुसार निर्णय घेतला आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव किंवा गैरवापर झालेला नाही. भाजपने कधीही दबावाचे किंवा जबरदस्तीचे राजकारण केले नाही, असे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे बोलताना दिले.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. बिनविरोध निवडणुकांबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले की, ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, तेथील सर्व संबंधितांचे त्यांनी आभार मानले. स्पष्ट बहुमत असलेल्या ठिकाणी अनावश्यक निवडणूक खर्च टाळण्यासाठी बिनविरोध निवडणुका होणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकमधील राजकीय परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे यांनी निवडणुकीच्या शेवटपर्यंत त्यावर तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (एमएलआरसी) नियमांतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी केली असून, शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांच्या निपटऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अधिकार महसूल मंत्र्यांकडे होते, मात्र आता ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नदीकाठच्या, शासन मालकीच्या अथवा इतर सरकारी जागांवरील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा स्थानिक पातळीवर शिबिरे घेऊन करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मंत्रालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ही मागणी गेल्या दहा वर्षांपासून केली जात होती. शर्तभंग प्रकरणांमधील दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले की, या सुधारणेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील वाळू धोरणाबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले की, एकूण वाळू साठ्यापैकी १० टक्के वाळू स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. घरकुल योजना किंवा खाजगी बांधकामांसाठी ही वाळू प्रति ब्रास ६०० रुपये दराने उपलब्ध करून दिली जाईल. पुढील पाच वर्षांत नैसर्गिक नदीपात्रातील वाळूचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करून कृत्रिम वाळू (एम-सँड) वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्टोन क्रशर उभारण्याचे आवाहन करण्यात आले असून राखेपासूनही वाळू निर्मितीचा पर्याय विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील बंद पडलेल्या दगडखाणींमध्ये कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पातील राख टाकून खड्डे बुजवले जातील. त्यानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपण करून ग्रीन झोन विकसित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना बावनकुळे म्हणाले की, आमचे कुलदैवत एकच असून त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा आहेत.
धर्मांतरण प्रकरणातील कारवाईचे स्वागत
कामठीतील कथित महिला धर्मांतरण प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे अभिनंदन केले. महिलांशी संबंधित गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश झाल्याबद्दल पोलिसांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी कौतुक केले.








