नाशिकमधून एका व्यक्तीला अटक
लोकवाहिनी न्यूज:नवी दिल्ली : ३ मे रोजी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची बाब समोर आल्याने भारत सरकारच्या मान्यतेने, राष्ट्रीय चाचणी संस्थेने नीट (यूजी) २०२६ परीक्षा रद्द करण्याचा आणि ती वेगळ्या अधिसूचित तारखांवर पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा रद्द झाल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसशी संबंधित व्यक्तीचा सहभाग असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. यासोबतच देशभरात अनेकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका नाशिकमधील प्रिंटिंग प्रेसमध्ये छापण्यात आली होती. त्यानंतर ती हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, बिहार आणि केरळ यांसारख्या राज्यांमध्ये पोहोचल्याचे संशयित मार्ग समोर आले आहेत.
भारत सरकारने सर्व आरोपांची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीए या तपासात सीबीआयला पूर्ण सहकार्य करेल आणि तपासासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, नोंदी आणि सहाय्य प्रदान करेल. पुनर्परीक्षेसाठी कोणतीही नवीन नोंदणी आवश्यक असणार नाही, तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. शिवाय, विद्यार्थ्यांनी आधीच भरलेले कोणतेही शुल्क त्यांना परत केले जाईल. यावेळी, NTA आपल्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून पुनर्परीक्षा आयोजित करेल. पुनर्परीक्षे संदर्भात पुढील माहिती येत्या काही दिवसांत अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली जाईल.
गेल्या ३ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटीचा संशय निर्माण होऊ लागला होता. राजस्थानमधील अनेक विद्यार्थ्यांकडे हस्तलिखित अंदाजपत्रके सापडली, ज्यातील प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळणारे असल्याचे म्हटले जात होते. यानंतर प्रकरण अधिकच चिघळले. १० मे रोजी, गुप्त माहितीच्या आधारे, राजस्थान विशेष कृती गटाने (एसओजी) डेहराडून, सीकर आणि झुंझुनू येथून १३ संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये सीकरमधील एका कोचिंग संस्थेशी संबंधित करिअर समुपदेशकाचाही समावेश होता.
आरोपी शुभम खैरनारने पेहराव बदलला
नाशिकमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव शुभम खैरनार असं असून त्याने १० लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन १५ लाख रुपयात विकल्या. त्यानंतर प्रश्न पत्रिका इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती आहे. आरोपीने डोक्यावरील केस कापून पेहराव बदललेला होता तरी देखील पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतलं. ३० वर्षांचा शुभम मूळचा नांदगाव तालुक्यातील गंगाधरी गावचा असून, तो बीएएमएसचा विद्यार्थी आहे. तो नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देखील काऊंसिलिंग करत होता. नीट पेपर फुटी प्रकरणात नांदगावच्या शुभम खैरनारचे नाव समोर येताच त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. शुभमच्या वडिलांच्या मते आमचा मुलगा निर्दोष सुटेल, त्याचा या प्रकाराशी काही संबंध नाही. शुभमचे वडील हे पेशाने डॉक्टर असल्याची माहिती आहे.









