चौकाचौकांत सिगारेट, मद्य, अमली पदार्थांच्या पाट्या
(प्रसन्न जकाते)
नागपूर : उपराजधानी नागपुरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या तरुणांच्या टोळक्यांचा धिंगाणा हा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. शहरातील अनेक चौक, मुख्य रस्ते आणि निर्जन ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सिगारेट, चहा आणि मद्याच्या पाट्या रंगत असल्याचे चित्र आहे. छत्रपती चौक, रॅडिसन ब्लू हॉटेल परिसर, रामदासपेठ, बजाजगर, मानेवाडा चौक, बर्डे, विमानतळ परिसर, खामला, वर्धा रोड आणि मोमीनपुरा या भागांमध्ये रात्रीच्या वेळी तरुण-तरुणींच्या टोळक्यांची वर्दळ दिसून येत आहे, काही ठिकाणी सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितेला बाधा पोहोचवणारे प्रकार घडत आहे.
रॅडिसन ब्लू हॉटेल परिसरातील उड्डाणपुलाखालील अंधाऱ्या जागांमध्ये काही तरुण-तरुणी कारमध्येच आक्षेपार्ह वर्तन करीत असल्याचे निदर्शनास येते. विमानतळ परिसरही रात्री उशिरापर्यंत अशलील चाळे करणाऱ्या अशा तरुणांच्या वाहनांची वर्दळ असते. निर्जन जागा आणि अपुऱ्या प्रकाशाचा गैरफायदा घेतला जातो. या सर्व ठिकाणी नियमित गस्त आणि गस्त वाढविण्याची गरज आहे.
हिंगणा रोडमार्गे वानाडोंगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी सिगारेट आणि मद्याच्या सेवनासाठी तरुणांचे गट जमतात. या परिसरात अमली पदार्थ, विशेषतः एमडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेफेड्रोनची विक्रीही होते. त्यानंतर हे तरुण, तरुणी सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह कृत्य सुरू करतात.
रात्री फिरणाऱ्या काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर नंबर प्लेट नसल्याचे, तर काही वाहनांच्या नंबर प्लेटवरील एक-दोन अंक जाणूनबुजून खोडलेले असल्याचे निदर्शनास आले आहे, काही वाहनांवर पुढील आणि मागील नंबर प्लेट वेगवेगळ्या असल्याचेही लोकवाहिनीने केलेल्या पाहणीत आढळले आहे. अशा प्रकारांमुळे वाहनांची ओळख पटविणे आणि गुन्ह्यांच्या तपासात वाहनांचा माग काढणे कठीण होऊ शकते.
लोकवाहिनीची १५ दिवस रात्री पाहणी
नागपूर शहरातील रात्रीच्या वास्तवाचा वेध घेण्यासाठी लोकवाहिनीच्या प्रतिनिधींनी १५ दिवस शहरातील विविध भागांत रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष फिडून माहिती संकलित केली. या पाहणीत रात्री उशिरापर्यंत तरुणांच्या टोळक्यांची वर्दळ, काही ठिकाणी मद्यपान आणि वाहनांच्या नंबर प्लेटमधील अनियमितता निदर्शनास आली. अशलील प्रकार, मोकाट कुत्र्यांना जवळचे मांस आणि दारू देण्याचे प्रकारही दिसले.













