घेतलेल्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला. मतमोजणीसाठी अपक्ष उमेदवारांच्या मतपेट्या टेबलवर ठेवण्यात आल्या नसून, केवळ चार ते पाच उमेदवारांच्या पेट्या ठेवल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात आक्षेप नोंदवूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. आक्षेप घेऊनही दखल न घेतल्याने आणि पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या कारभारावर ठपका ठेवत नऊ उमेदवारांनी मतमोजणी केंद्राबाहेर ठिय्या दिला.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी करताना प्रत्येक उमेदवाराच्या मतपत्रिकेसाठी स्वतंत्र बॉक्स ठेवणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ सहा ते सात बॉक्स ठेवण्यात आल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला. सर्व उमेदवारांच्या मतपत्रिकांची योग्य पद्धतीने वर्गवारी आणि मोजणी व्हावी, यासाठी पुरेशा बॉक्सेसची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली. या व्यवस्थेवर आक्षेप घेतल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे होते.
या प्रकरणी उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार देण्यास सांगितल्याचे उमेदवारांनी सांगितले. त्यानुसार लेखी तक्रारही सादर करण्यात आली, मात्र तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. मतमोजणी प्रक्रियेतील व्यवस्थेबाबत आक्षेप नोंदवूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.
आक्षेप नोंदविणाऱ्या उमेदवारांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप ॲड. प्रदीप सोमकुवर, ॲड. संदीप शेंडे आणि सचिन काळबांडे यांनी केला. मतमोजणीतील व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर तक्रारीची दखल घेणेऐवजी पोलिसांकडून अशी वागणूक मिळाल्याचे त्यांचे म्हणणे होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नऊ उमेदवारांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर ठिय्या देत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
नागपूरमधील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीचे विविध टप्पे, निकालांचे कल आणि अधिकृत माहिती वेळेत मिळवण्यासाठी विविध माध्यमांचे प्रतिनिधी केंद्रावर उपस्थित होते. यावेळी बॉक्सेसच्या व्यवस्थेवरून उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने मतमोजणी केंद्राबाहेर निषेधाचे वातावरण निर्माण झाले.













