शेफ विष्णू मनोहर यांची खवय्यांना ३,५०० किलोची मेजवानी
लोकवाहिनी न्यूज यवतमाळ : वऱ्हाडातील खाद्यसंस्कृतीची आगळीवेगळी ओळख आणि यवतमाळकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या प्रसिद्ध बुढीच्या चिवड्यावर आज मंगळवारी जागतिक स्तरावर मोहोर उमटली. यवतमाळच्या अंजनाबाई भुजाडे यांनी ९० वर्षांपूर्वी निर्माण केलेला बुढीचा चिवडा येथील दाते महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या एस. एल. फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि शहरातील विविध संस्था-संघटनांच्या सहकार्याने वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया या विश्वविक्रमाच्या माध्यमातून जगभर पोहोचला. यावळी तयार झालेला चिवडा नागरिकांना आणि विविध शाळा, सामाजिक संस्थांना मोफत वितरित करण्यात आला.
शेफ विष्णू मनोहर आणि प्राजक्ता पै व एस. एल. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळची ही पारंपरिक चव जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी या विश्वविक्रमाचा संकल्प सोडला होता. येथील दाते कॉलेजच्या मैदानावर सोमवारी रात्रीपासून ३,५०० किलो बुढीचा चिवडा बनविण्याची तयारी सुरू झाली. थेट कोराडीहून शनिवारीच यवतमाळात दाखल झालेल्या महाकाय कढईत हा चिवडा तयार करण्यात आला. यासाठी पडद्यामागे मोफत चिवडा वितरणाचे नियोजन गर्दीमुळे विस्कळीत झाले, त्यामुळे उपस्थित मान्यवर, आयोजक आणि सकाळी साडेआठनंतर या विश्वविक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना चिवड्याची चव चाखता न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
जवळपास १०० वर कामगार अहोरात्र झटत होते. एस.एल. फाउंडेशनचे अध्यक्ष अश्विन सबाळाखे आणि चमूच्या अथक परिश्रमातून यवतमाळचे नाव जागतिक स्तरावर पोहोचले. तुमच्या शहरात काय प्रसिद्ध आहे, असा प्रश्न कोणालाही यवतमाळकराला केला की, बुढीचा चिवडा हे उत्तर कानावर पडते. कुरकुरीत पोह्यांचा आणि त्यावर मोट टाकून लिंबू पिळून हातावर घेतलेली चिवड्याची पुडी सध्या २० रुपयात मिळते. ९० वर्षांपूर्वी १९३६ मध्ये ही चिवड्याची पुडी केवळ एक आण्याला (सहा पैसे) मिळायची. येथील अंजनाबाई रामचंद्र भुजाडे यांनी १९३६ मध्ये आझाद मैदानावर चिवडा विकण्यास प्रारंभ केला.













