मुख्यमंत्री फडणविसांचा विश्वास
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. २०१५ मध्येच महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असून, आतापर्यंतचा प्रवास चांगला झाला आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ६६० अब्ज डॉलरची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘रायझिंग भारत’ या शिखर परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची आर्थिक प्रगती, गुंतवणुकीच्या संधी, भारत-अमेरिका व्यापार करार आणि महाराष्ट्राकडील महायुती सरकारच्या कामकाजावर आपली भूमिका मांडली. जागतिक पातळीवर विविध आर्थिक आव्हाने असतानाही भारत आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत फडणवीस आशावादी आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरात बदल होत असतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे डॉलरमधील मूल्यही बदलू शकते. मात्र, या बदलामुळे आपण चिंतित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक पातळीवर आर्थिक परिस्थिती बदलत असली, तरी भारत आणि महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून रोजगरणाच्या संधी वाढवणे आणि राज्याचा आर्थिक विकास साधणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे. २०३० पर्यंत निर्धारित आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या वक्तव्यतून स्पष्ट झाले.
भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार कराराबाबतही फडणवीस यांनी भाष्य केले. आंतरराष्ट्रीय व्यापार करारांचा पूर्ण अनुभव असला, तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत ठोस भाष्य करण्याइतकी आपली तज्ज्ञता नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, या कराराबाबत आशावादी राहायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारासाठी बहुतांश चर्चा पूर्ण झाल्या असून, कराराला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी सांगितले होते. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक संबंधांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या मुंबई दौऱ्याचा फडणवीस यांनी उल्लेख केला. यांच्यासोबतची भेट कमी वेळेसाठी झाली होती. मात्र, मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत ते समाधानी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी आहेत. आघाडी सरकार चालवताना वेगवेगळ्या मतांचे आणि विचारांचे पक्ष एकत्र काम करत असल्याने काही आव्हाने निर्माण होतात. अशा परिस्थितीत सर्वांमध्ये समन्वय घडवून आणणे महत्त्वाचे असते, असे फडणवीस म्हणाले. महायुती सरकारमध्ये आतापर्यंत ९९ टक्के मुद्द्यांवर एकमत साधण्यात यश आल्याचा दावा त्यांनी केला. तिन्ही पक्षांना महाराष्ट्राचा विकास साधायचा आहे. काही विषयांवर मतभेद असले, तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरही फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात सरकारची भूमिका टिकून राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












