लोकवाहिनी न्यूज नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा ‘दीक्षाभूमी’च्या संविधानवादी आणि पुरोगामी विचारांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत भाजपच्या सत्ताधारी यंत्रणेला मोठा धक्का दिला. या विजयानंतर डॉ. नितीन राऊत यांनी भाजपवर थेट आणि घणाघाती हल्ला चढवला.
ते म्हणाले, हा विजय म्हणजे केवळ एका निवडणुकीचा कौल नसून, ही दीक्षाभूमीच्या पुरोगामी विचारांची संघभूमीवरील वैचारिक मात आहे. भाजपचे दिग्गज नेते, मंत्रिमंडळ आणि संपूर्ण सत्ताधारी यंत्रणा या निवडणुकीत प्रचारासाठी रस्त्यावर उतरली होती. मात्र, नागपूरच्या सुशिक्षित पदवीधरांनी सत्तेचा अहंकार, हुकूमशाही आणि फसव्या अजेंड्याला पूर्णपणे नाकारले आहे. मतदारांनी संविधानाची मूल्ये, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने ठाम कौल देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधरेचा विजय घडवून आणला आहे.
गुलालाची उधळण व घोषणाबाजी
अभिजित वंजारी यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच उत्तर नागपुरातील बेझनबाग येथील डॉ. नितीन राऊत यांच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व जल्लोष केला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, निळे-तिरंगे झेंडे आणि ‘जय भीम’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा केला. या वेळी काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय आणि महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
डॉ. राऊत पुढे म्हणाले की, सध्या देशभरात जननायक राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भाजपच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध आणि वेंट चोरीच्या कारभाराविरुद्ध ‘संविधान सन्मान’ लढा तीव्र होत आहे. अशा निर्णायक काळात संघभूमीच्या गडातून मिळालेला हा विजय संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नवी नांदी ठरेल. त्यांनी विजयी उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांचे अभिनंदन करत काँग्रेस, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सुशिक्षित पदवीधर मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले.












