मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार | आर्वीत एफएमसीजी व पेयपदार्थ निर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्प | अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्पात ५५० जणांना थेट रोजगार
लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यातील कृषी व अन्नप्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया उद्योगांना चालना देतानाच शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धनाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पामुळे ५५० जणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी वरुण बेव्हरेजेस लिमिटेड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यात या प्रकल्पासंदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला.
फळांचे ज्यूस, अन्नप्रक्रिया तसेच कृषीमालावर आधारित उद्योगांच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या या गुंतवणुकीमुळे स्थानिक शेतकरी, कृषीपूरक व्यवसाय आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. आर्वी येथील एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात दैनंदिन वापरातील ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) आणि पेयपदार्थांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारण्यात येणार आहे. प्रस्तावानुसार, प्रकल्पाचे काम एप्रिल २०२७ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे.












