ॲलेक्स, आरडीएक्स, विश्वासचे आकर्षण!
लोकवाहिनी न्यूज
पुष्कर : राजस्थानमधील पुष्कर येथे भरलेल्या अंतरराष्ट्रीय पशुमेळ्यात यंदा मारवाडी जातीच्या घोड्यांनी विशेष लक्ष वेधुन घेतले आहे. देशभारतून दाखल झालेल्या या घोड्यांमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या आरडीएक्स, ॲलेक्स आणि पांढऱ्याशुभ्र विश्वास यांची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. तब्बल ६८.५ इंच उंचीचा आरडीएक्स, सुमारे ५ कोटी रुपये किंमत असलेला ॲलेक्स आणि ५०० हून अधिक पिलांचा पिता असल्याचा दावा केला जाणारा विश्वास हे मेळ्याचे खास आकर्षण ठरत आहेत.
पुष्करचा पशुमेळा देशातील प्रसिद्ध पशुमेळ्यांपैकी एक असून, येथे राजस्थानसह महाराष्ट्र, पंजाब, गुजरात आणि हरियाणातून पशुपालक सहभागी होतात. मारवाडी घोड्यांची वैशिष्ट्यपूर्ण शरीरयष्टी, आकर्षक चाल आणि राजेशाही थाट यामुळे त्यांना घोड्यांच्या शौकिनांमध्ये विशेष मागणी असते. यंदा महाराष्ट्रातून आलेल्या या तीन घोड्यांमुळे मेळ्याची रंगत आणखी वाढली आहे.
६८.५ इंच उंचीचा आरडीएक्स महाराष्ट्रातून आलेल्या आरडीएक्स या मारवाडी घोड्याची उंची हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तब्बल ६८.५ इंच उंची, मजबूत शरीरयष्टी आणि आकर्षक चाल यामुळे तो मेळ्यातील इतर घोड्यांपेक्षा वेगळा ठरत आहे. मैदानात त्याची फेरी सुरू होताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमते. अनेक जण त्याच्यासोबत छायाचित्रे आणि सेल्फी काढताना दिसतात.
५ कोटींचा ॲलेक्सही चर्चेत आरडीएक्स सोबतच महाराष्ट्रातून आलेला ॲलेक्स हा घोडाही आकर्षणचा केंद्रबिंदू ठरला आहे. सुमारे १० वर्षांचा आणि ६५ इंच उंची असलेल्या ॲलेक्सची किंमत तब्बल ५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. सुबक शरीरयष्टी, चमकदार त्वचा आणि रुबाबदार चालीमुळे त्याला पाहण्यासाठीही मोठी गर्दी होत आहे. आरडीएक्स आणि ॲलेक्स या दोन्ही घोड्यांचा प्रजननासाठी वापर केला जात असल्याची माहिती त्यांच्या मालकाने दिली.
५०० हून अधिक पिलांचा पिता ‘विश्वास’ पांढऱ्याशुभ्र रंगाचा मारवाडी घोडा विश्वास यानेही मेळ्यात सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे. त्याचा दुधासारखा पांढरा रंग आणि राजेशाही थाट पाहण्यासारखा आहे. मात्र, त्याच्या लोकप्रियतेमागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या मालकाने केलेला दावा. विश्वास आतापर्यंत ५०० हून अधिक पिलांचा पिता झाला असल्याचा मालकाचे म्हणणे आहे.















