गौरव झाडे ठरला ‘बेस्ट ऑलराउंडर’
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ‘अवादा विदर्भ व्हिजन कप दृष्टिहीन क्रिकेट स्पर्धा – २०२६’ मध्ये मंगळवारी चंद्रपूर व अमरावती संघात अंतिम सामना चांगलाच रंगला. वसंतनगर येथील मुजुमदार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात चंद्रपूर संघाने १० धावांनी अमरावती संघाचा पराभव करत ‘व्हिजन कप’ आपल्या नावावर केला.
अवादा फाउंडेशन, असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ ब्लाइंड क्रिकेट इन विदर्भ आणि नागपूर येथील आत्मदीपम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम सामन्यात चंद्रपूर संघाने प्रथम फलंदाजी घेत २० षटकांमध्ये ९ गडी बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अमरावती संघाला १९.२ षटकांत सर्व बाद १७२ धावाच करता आल्या.
यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चंद्रपूर संघाचा कर्णधार गोकुल पारधी याने संघाच्या वतीने विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारली. गौरव झाडे याला ‘बेस्ट ऑलराउंडर’ पुरस्कारही देण्यात आला. त्याने प्रभावी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासोबतच धावांमधील उत्कृष्ट कामगिरी केली. तौफिक अलीने प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा किताब देण्यात आला.
या स्पर्धेत दृष्टिबाधित खेळाडूंसाठी बी-१, बी-२ आणि बी-३ अशा तीन श्रेणींमध्ये सामने खेळविण्यात आले. बी-१ श्रेणीतील खेळाडू पूर्णतः दृष्टिहीन असून, त्यांना केवळ आवाजाच्या आधारे खेळावर लक्ष केंद्रित करावे लागते. बी-२ श्रेणीतील खेळाडूंना अत्यल्प प्रकाशाची जाणीव होते, तर बी-३ श्रेणीतील खेळाडूंना त्यापेक्षा थोडी अधिक दृष्टी असते.
बी-३ श्रेणीत गौरव झाडे याने संपूर्ण मालिकेत २६५ धावा करत उत्कृष्ट कामगिरी केली. बी-२ श्रेणीत अमरावती संघाच्या अभिजीत धोबे याने ११४ धावा करत सहा बळी घेतले. बी-१ श्रेणीत अक्षय चौधरी याची उत्कृष्ट कामगिरी ठरली. या तिन्ही खेळाडूंना त्यांच्या श्रेणीतील ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
निसर्ग दत्त फाउंडेशनच्या वतीने विशेष शतकी कामगिरीसाठी नागपूर संघातील योगेश धात्रक याला एक हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा तसेच विजेता व उपविजेता संघाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
१४ वर्षीय मोहितला विशेष पुरस्कार
चंद्रपूर संघातील १४ वर्षीय मोहित याला विशेष पुरस्कार देण्यात आला. त्याने या स्पर्धेत दोन सामने खेळले. विशेष म्हणजे त्याचा पहिलाच सामना याच मैदानावर आणि याच स्पर्धेत झाला. त्याच्या सहभागाचे आणि कामगिरीचे कौतुक करत त्याला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रवींद्र भुसारी, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. अविनाश गावंडे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, प्रशांत वैद्य, अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे मेडिकल सल्लागार डॉ. अनिरुद्ध चक्रवर्ती, अवादा इलेक्ट्रोचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट मृदुल गहलोत आदींची उपस्थिती होती















